रेतीचोरी थांबविणार कोण ?
By Admin | Updated: October 10, 2015 00:34 IST2015-10-10T00:34:03+5:302015-10-10T00:34:03+5:30
प्रशासन रेतीची चोरी थांबवू शकत नसेल तर, अवैध रेती वाहतुकीमुळे खराब झालेले शेतीचे रस्ते तरी या तस्करांच्या माध्यमातून प्रशासनाने दुरुस्त करून घ्यावेत,...

रेतीचोरी थांबविणार कोण ?
मोर्शीत माफिया सक्रिय : तस्करी रोखता येत नसेल तर खोदलेले रस्ते तरी दुरूस्त करा
मोर्शी : प्रशासन रेतीची चोरी थांबवू शकत नसेल तर, अवैध रेती वाहतुकीमुळे खराब झालेले शेतीचे रस्ते तरी या तस्करांच्या माध्यमातून प्रशासनाने दुरुस्त करून घ्यावेत, अशी आगळी वेगळी मागणी शेतकऱ्यांव्दारे केली जात आहे.
तालुक्यातील कोपरा, तरोडा, धानोरा आणि सावरखेडा या क्षेत्रातून नळा नदी वाहते. संबंधित क्षेत्र हे वन विभागात येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र या क्षेत्राचा लिलाव महसूल विभागातर्फे केला जात नाही. या संधीचा फायदा घेत तस्करी करणारे या वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून महसूल क्षेत्रातून वाहतूक करतात. सतत अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत असल्यामुळे, शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते खराब झाले आहे. टॅ्रक्टरच्या चाकांमुळे या रस्त्यांवर खोल चाकोऱ्या पडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची औजारे, बैलबंडी या मार्गावरून नेणे कठीण झालेले आहे. (तालुका प्रतिनिधी)
संबंधित विभागाची डोळेझाक
नळा नदीपात्रात रेतीचे उत्खनन करून दिवसा ढवळ्या चाळणीव्दारे रेती छानून ठेवली जाते आणि रात्रीला रेतीची टॅ्र्रक्टरव्दारे वाहतूक केली जाते. नदी पात्राचे काठसुध्दा खोदले जात असल्याचे दिसून आले आहेत. या प्रकाराकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. वास्तविक पाहता वन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून संबंधित टॅ्र्रक्टर जप्त केल्यावर निकाल लागेपर्यंत टॅ्र्रक्टरची सुटका होण्याची शक्यता नसते. तथापि या कायद्याची भीतीही तस्करांना नाही. दुसरीकडे वन क्षेत्रातून रेतीचे उत्खनन करुन मोर्शी, पाळा आणि अंबाडा मार्गाने रेतीची वाहतूक महसूल विभागातून होत असताना, महसूल विभागातर्फेही अटकाव केली जात नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.
काही रेती माफियांना राजाश्रय
रेती तस्करीत गुंतलेल्यांना राजाश्रय प्राप्त असल्याची चर्चा आहे. ज्यांच्या पाठीशी राजाश्रय आहे, अशा रेती तस्करीत गुंतलेल्यांवर कारवाई होत नाही. मात्र ज्यांच्या पाठीशी राजाश्रय नाही, अशांवर कारवाई केली जात असल्याचीही ओरड आहे. ही चर्चा जर खरी असेल तर त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रेती तस्करांकडून रस्ते दुरुस्त करून घ्यावेत
प्रशासन जर रेती तस्करांवर अंकुश लावू शकत नसेल तर कमीत कमी अवैध रेती वाहतुकीमुळे शेतकऱ्यांचे खराब झालेले रस्ते तरी या रेती तस्करांकडून दुरुस्त करवून घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.