वणवा कुणावर शेकणार ?
By Admin | Updated: March 11, 2017 00:15 IST2017-03-11T00:15:53+5:302017-03-11T00:15:53+5:30
जंगलात पेटणारा वणवा हा मानवी हस्तक्षेपामुळे भडकत असल्याचे मानले जात असल्याने वन विभागाने कंबर कसली असून...

वणवा कुणावर शेकणार ?
मानवी हस्तक्षेपाचा अंदाज : संशयितांचा शोध घेण्याचे वनविभागाचे आदेश
अमोल कोहळे पोहराबंदी
जंगलात पेटणारा वणवा हा मानवी हस्तक्षेपामुळे भडकत असल्याचे मानले जात असल्याने वन विभागाने कंबर कसली असून येणाऱ्या काळात वणव्यापासून जंगलांचे रक्षण करण्याकरिता वनविभागाने पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे आगीसाठी कारणीभूत असलेल्या संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश वनविभागाने वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा परिसरात वणवा पेटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. मागील काही दिवसांत दोन वेळा अशा घटना घडल्यामुळे वनप्रशासनाने यावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी वणवा पेटला आहे त्या ठिकाणी तत्काळ पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तयारी केली आहे. वडाळी बीट मध्ये मागील चार दिवसांत मध्यरात्रीच्या सुमारास वणव्याची घटना समोर आली होती. यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले होते. वडाळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी हरिचंद्र पाडगाव्हकर, चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे, यांनी दोन्ही रेंजमधील वनकर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. पोहरा बीटमधील वणव्याला वनपाल विनोद कोहळे, चिरोडी वनपाल सदानंद पाचगे, इंदला बीटचे वनरक्षक शेंडे, चिरोडीचे वनरक्षक नाईक, बगळे, पवार, वनमजूर शालिक पवार, मंगल जाधव, विसू पठाण, बाबा पळसकर, चव्हाण यांनी नियंत्रणात आणले होते. यामुळे दोन्ही बीटमध्ये असलेला संवाद चांगला असल्याचे दिसून आले आहे. यासाठी वनविभागाने अग्नीशामन दल व पोलीस विभागाची मदत घेतली आहे.
वन्यजीवांची हानी नाही
पोहरा बीटमध्ये पेटलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असतानाच प्राण्यांची जीवितहानी तर झाली नाही ना, याचादेखील आढावा घेण्यात आला आहे. यात प्राण्याची हानी झालेली नाही, असे आढळून आल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास घेतला आहे.