औटघटकेसाठी कोण बनणार नगरसेवक ?
By Admin | Updated: June 30, 2016 00:23 IST2016-06-30T00:23:55+5:302016-06-30T00:23:55+5:30
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग ३२ ब या एका जागेसाठी आयोगाने मतदार यादी तयार ...

औटघटकेसाठी कोण बनणार नगरसेवक ?
नवाथेनगर प्रभाग : पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग
अमरावती : शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग ३२ ब या एका जागेसाठी आयोगाने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पोटनिडणुकीची तारीख अद्यापपर्यंत निश्चित झाली नसली तरी निवडून येणाऱ्यासाठी ते पद औटघटकेचेच ठरणार आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक अविरोध करण्याचे प्रयत्न राजकीय पातळीवर सुरू आहेत.
जानेवारी - फेब्रुवारी २०१७ मध्ये अमरावती पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवाथे प्रभागाची पोटनिवडणूक आॅगस्ट- सप्टेंबरमध्ये झाल्यास निवडून येणाऱ्या सदस्यांसाठी केवळ दोन महिने कार्यकाळ असेल व पुन्हा निवडणुका होतील. त्यामुळे या औटघटकेच्या पोटनिवडणुकीमध्ये ऊर्जा, श्रम आणि पर्यायाने पैसा न गमावता ती सर्व शक्ती सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान कामी पडेल, असा एक प्रवाह आहे. त्यामुळे दोन महिन्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीच्या भानगडीत न पडता दिगंबर डहाके यांच्या घरातील सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करायचे. विविध पक्ष संघटनांकडून होकार घ्यावा आणि ती रिक्त जागा अविरोध करावी, असा एक सूर महापालिकेत उमटला आहे. तथापि पोटनिवडणुकीची तारीख निश्चित झाल्याने या विषयावर कुणीही खुलेआमपणे बोलायला तयार नाही.
मतदारयादीला १६ जुलैची डेडलाईन
दिगंबर डहाके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ३२ ब च्या पोटनिडणुकीसाठी १६ जुलै रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन महाआॅनलाईनतर्फे तयार करण्यात आलेल्या संगणकामार्फत करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
महानगरपालिकेची मतदार यादी तयार करताना विधानसभा मतदारसंघातील यादीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभागात समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या आणि प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान असणे बंधनकारक आहे.
या प्रारुप मतदार याद्यांवर २३ जुलैपर्यंत स्थानिक मतदारांकडून हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. मतदारयादीचा कार्यक्रम घोषित झाला असला तरी प्रत्यक्ष निवडणुकीची तारीख घोषित न झाल्याने ते नगरसेवकपद औटघटनेचे ठरणार असल्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीसाठी नवाथे प्रभाग ३१ ब च्या छापील मतदारयाद्या अधीप्रमाणित करण्याचा व अंतिम मतदारयादी प्रसिद्धी करण्याचा दिनांक ३० जुलै असा आहे.
दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असतील तर त्यांची नावे त्या प्रभागातून वगळण्यात यावीत व योग्य प्रभागात समाविष्ट करण्यात यावी, अशा सूचना महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अमरावती ३२ ब प्रभागासह औरंगाबाद, नाशिक, ठाणे, लातूर आणि परभणी येथील पोटनिवडणुकीसाठीही मतदार यादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)