समाज दुभंगला तर कोण विचारणार ?
By Admin | Updated: September 2, 2016 00:16 IST2016-09-02T00:16:20+5:302016-09-02T00:16:20+5:30
धनगर समाजाला डावलून राज्यात कोणताही पक्ष सत्तेत राहू शकत नाही, हे वास्तव आहे.

समाज दुभंगला तर कोण विचारणार ?
ना. महादेव जानकर : राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सत्कार
अमरावती : धनगर समाजाला डावलून राज्यात कोणताही पक्ष सत्तेत राहू शकत नाही, हे वास्तव आहे. मात्र, समाज दुभंगला गेला तर कोणीही विचारणार नाही. त्यामुळे धनगर समाजाने एकजुट दाखवावी, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यपालन मंत्री महादेव जानकर यांनी येथे गुरुवारी केले.
राष्टीय समाज पक्ष जिल्ह्याच्या वतीने येथील अभियंता भवनात आयोजित सत्कार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रीय समाज पक्षाचे विजय गोहत्रे, डॉ. जयकुमार बनकर, दिलीप एडतकर, रामराव पातोंड, दत्ता खरात, अॅड. काळे, मनोज साबळे, अमित अढाऊ आदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना ना. जानकर म्हणाले, धनगर समाजाला प्रगती करायची असेल तर १०० मुले, मुलींना आयएएस अधिकारी करुन त्यांना प्रशासकीय सेवेत पाठवावे लागेल. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याचा मुद्दा कायम आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटेल त्यासाठी धनगर समाजाला एकीचे बळ दाखवावे लागेल. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये धनगर समाजाचे प्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून गेले पाहिजे, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. बारामतीत सर्व विरोधात असताना मी निवडून आलो. ही समाजाची ताकद आहे. मला मंत्रीपद, लाल दिव्याची हौस नसून पोलीस ताफा सोबत ठेवण्याची गरज नाही. समाजासाठी आपलं आयुष्य खर्ची घालण्याची तयारी ठेवली असून ती पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. सेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी हे धनगर समाजाचे हक्काचे घर असू शकत नाही. समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवायचा असेल तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या बॅनरखाली एकत्र यावे लागेल, असे ते म्हणाले. स्वत:चे घर सुरक्षित करुन अन्य समाजाला सोबत घेत धनगर समाजाला सत्ता मिळविता येईल. दोन खासदार असलेल्या भाजपने देशात एकहाती सत्ता काबीज केली, हे जीवंत उदाहरण आहे. धनगर समाजाने विदर्भातून पाच आमदार दिले तर महाराष्ट्राचे चित्र बदलवून दाखवेल, असे ते म्हणाले. त्यामुळे ‘पॉवर’ वाढवा सत्ता आपोआप मिळेल. दरम्यान ना. जानकर यांचा भलामोठा हार टाकून सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष विजय गोहत्रे यांनी पक्ष विस्तारासाठी ना. जानकर यांना एक लाखांचा धनादेश दिला. संचालन पुष्पा साखरे तर आभार प्रदर्शन रणजित अठोर यांनी केले. प्रास्ताविक विजय गोहत्रे यांनी केले.