‘आऊट सोर्सिंग’ निविदेत नियमांचा धक्का कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:40+5:302021-07-08T04:10:40+5:30
अमरावती : महापालिकेत मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थेची निवड प्रक्रिया आता बहुचर्चित झालेली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी प्रमुख अधिकाऱ्यांना खडेबोल सुणावल्याची ...

‘आऊट सोर्सिंग’ निविदेत नियमांचा धक्का कुणाला?
अमरावती : महापालिकेत मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थेची निवड प्रक्रिया आता बहुचर्चित झालेली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी प्रमुख अधिकाऱ्यांना खडेबोल सुणावल्याची माहिती आहे. दरम्यान यामधील अपूर्णांक कुणाला धक्का देणार, याची चर्चा महापालिकेत होत आहे.
मनुष्यबळ पुरविण्यासाठी १४ मे रोजी काढलेली निविदा पदाधिकाऱ्यांवरील हस्तक्षेपाच्या आरोपामुळे आता वादग्रस्त बनलेली आहे. प्रशासनाच्या प्रक्रियेपूर्वी यात हस्तक्षेप कसा, असा सवाल करीत विरोधी पक्षाने घेत या वादात उडी घेतल्याने प्रक्रिया पारदर्शी होणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. लवकरच निविदा प्रक्रिया होणार असल्याचेही ते म्हणाले.
तांत्रिक व वित्तीय बिड उघडण्यात आल्यानंतर आता एल-१ चा क्रम ठरविण्यात येणार आहे. यासाठी निवड समितीच्या बैठकीत नियमांची बारकाईने तपासणी होणार आहे. दरम्यान अपूर्णांक, स्थानिकांना प्राधान्य आदी नियमांची चर्चा महापालिका वर्तुळात चांगलीच रंगली आहे. काही जण यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया होणार असल्याचे भाकीत करीत असल्याने निविदा पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
बॉक्स
इकडे आड, तिकडे विहीर
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित राहिल्याच्या गदारोळामुळे काही अधिकाऱ्यांना आयुक्तांनी खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. पदाधिकाऱ्यांना बैठकीला अनुपस्थित राहिल्यास त्यांची खप्पामर्जी ओढावून घेणेही परवडणारे नाही. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांची इकडे आड, तर तिकडे विहीर, अशी गत झाल्याची व्यथा एका अधिकाऱ्याने बोलून दाखविली.