दीपाली चव्हाण यांच्या पत्रातील मनीषा उईके कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST2021-03-29T04:08:04+5:302021-03-29T04:08:04+5:30
परतवाडा : ‘मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी नाही होणार, तिने माझे आयुष्य बरबाद केले’ असे हरिसाल वनपरिक्षेत्र ...

दीपाली चव्हाण यांच्या पत्रातील मनीषा उईके कोण?
परतवाडा : ‘मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी नाही होणार, तिने माझे आयुष्य बरबाद केले’ असे हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी पतीला लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. मनीषा उईके नामक महिलेच्या नावाचा असा उल्लेख आल्याने ती कोण, या चर्चेला उधाण आले आहे. शोध घेतला असता, मनीषा उईके कोण, हे निष्पन्न झाले. ती मांगिया गावची रहिवासी असल्याचे व चव्हाण यांच्या विरोधात दाखल अॅट्राॅसिटी प्रकरणातील ती फिर्यादी असल्याचे समोर आले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा गुगामल वन्यजीव विभागांतर्गत हरिसाल परिक्षेत्रातील मांगिया गावाचे पुनर्वसन चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगावनजीक करण्यात आले आहे. पुनर्वसन झाल्यानंतर त्या शेतजमिनी वनविभागाने ताब्यात घेतल्या. तशी सातबारावर नोंदसुद्धा झाली. परंतु पुनर्वसित झालेल्या काही आदिवासींनी या शासकीय जमिनीवर सात महिन्यांपूर्वी पीक पेरणीला सुरुवात केली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना ही माहिती मिळताच त्यांनी अधिनस्त वनकर्मचाऱ्यांना घेऊन ताफ्यासह पीक पेरणी करणाऱ्या आदिवासींना मज्जाव केला होता. यात आदिवासी आणि वनकर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष उडाला होता. यात गावकऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले होते. महिला कर्मचारी असताना वरिष्ठ अधिकारी हा सर्व तमाशा दुरूनच पाहत असल्याची चर्चा त्यामुळे चांगलीच रंगली होती.
विनोद शिवकुमारचा मनीषा उईकेला सपोर्ट?
पुनर्वसित मांगीया गावातील शेत जमिनीवरील अतिक्रमण काढताना आदिवासी आणि वनविभागात उडालेला संघर्षातून वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्याविरुद्ध अॅट्राॅसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यासाठी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने मांगिया येथील महिला मनीषा उईके हिला प्रोत्साहित केल्याची चर्चा वनकर्मचाऱ्यांमध्ये आहे. अॅट्राॅसिटीच्या त्या प्रकरणात उईके या फिर्यादी असल्याची माहिती आहे. केवळ सूड भावनेतून हा गुन्हा नोंदविण्यात आल्याची प्रतिक्रिया वनकर्मचाऱ्यांमध्ये आहे.