आम्हाला प्रवेशापासून रोखणारा शिक्षण विभाग कोण?
By Admin | Updated: July 12, 2016 01:15 IST2016-07-12T01:15:54+5:302016-07-12T01:15:54+5:30
कठोरा येथे एडीफाय शाळा सुरू करण्यास शासनानेच आम्हाला मान्यता दिली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी व

आम्हाला प्रवेशापासून रोखणारा शिक्षण विभाग कोण?
अमरावती : कठोरा येथे एडीफाय शाळा सुरू करण्यास शासनानेच आम्हाला मान्यता दिली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला वा आदेशाला आम्ही बांधिल नाही, असा दावा करीत एडीफाय व देवी एज्युकेशन सोसायटीने जिल्हा प्रशासनासह राज्य शासनालाच आव्हान दिले आहे.
एडीफाय व देवी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सोमवारी पत्रपरिषद घेण्यात आली. त्यात संस्थेचे अध्यक्ष पुरण हबलानी यांनी ‘एडीफाय’ च्या अधिकृततेचा दावा केला. मात्र त्यापोटी ते कोणताही दस्ताऐवज दाखवू शकले नाहीत. राज्य शासनाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेला कुठलाही आदेश आम्हाला बंधनकारक नाही, असा दावा ‘एडीफाय’चे संचालक गौरव मारोटिया यांनी केला.
शालेय शिक्षण विभागाकडून १७ मे रोजी देवी एज्युकेशन सोसायटीच्या एडीफाय या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला परवानगी मिळाली. त्यानंतरच प्ले ग्रुप ते आठवीपर्यंत ५३२ प्रवेश करण्यात आले. शाळा सुरू करण्यास आम्हाला शासनाने परवानगी दिली आहे. तसे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्याचा दावा ‘एडीफाय’ शाळेकडून करण्यात आला. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांचे त्यासंदर्भातील कुठलेही पत्र ते दाखवू शकले नाहीत. ते निरुत्तर झाले होते.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राने काय बिघडणार ?
४देवी एज्युकेशन सोसायटीच्या एडीफाय या शाळेमध्ये कुणीही प्रवेश घेवू नये, शालेय सत्रादरम्यान परवानगी रद्द झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, त्याची जबाबदारी पालकांची राहील, असे प्रसिद्धीपत्रक प्राथमिक शिक्षणाधिकारी पानझाडे यांनी काढले होते. मात्र त्या पत्राने शाळेवर कुठलाही विपरित परिणाम होणार नाही, असा दावा हबलानी आणि मारोटिया यांनी केला. स्थानिक प्राधिकरणाचा कुठलाही आदेश आम्हाला लागू होत नाही, असा दावा त्यांचेकडून वारंवार करण्यात आला.
जगाच्या पाठीवर त्यांनी कुठेही शाळा काढावी. देवी एज्युकेशन सोसायटीच्या एडीफाय शाळेची परवानगी काढून घेण्याची शिफारस शिक्षण संचालकांमार्फत राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. शाळा अनधिकृत आहे. लवकरच निर्णय जाहीर होईल.
- एस.एम. पानझाडे, शिक्षणाधिकारी