‘गोड विष’ विक्रीला अभय कुणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 21:59 IST2018-06-30T21:58:50+5:302018-06-30T21:59:13+5:30
तालुक्यात सर्वत्र भेसळयुक्त कुंदा वपरून खवा व पेढे विक्री व्यवसायच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. सामान्य नागरिकांसाठी ही मिठाई ‘गोड विष’ ठरत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून, संबंधित अधिकाऱ्यांसाठी हे चिरीमिरीचे साधन बनत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.

‘गोड विष’ विक्रीला अभय कुणाचे?
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यात सर्वत्र भेसळयुक्त कुंदा वपरून खवा व पेढे विक्री व्यवसायच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. सामान्य नागरिकांसाठी ही मिठाई ‘गोड विष’ ठरत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून, संबंधित अधिकाऱ्यांसाठी हे चिरीमिरीचे साधन बनत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.
पेढे, मिठाई तयार करण्याकरिता मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त कुंदाचा वापर होत असल्याचे सत्य 'लोकमत'ने समोर आणताच तालुक्यातील काही स्वीट मार्ट संचालकांचे धाबे दणाणले. कुंद्यात मानवी आरोग्याला अपायकारक पदार्थ मिसळून तयार केलेल्या मिठाईची राजरोस विक्री केली जाते. याबाबत अन्न व औषध प्रशासन मूकदर्शक बनले आहे.
हॉटेल, मिठाई दुकानदार, स्वीटमार्ट संचालकांचे परवाना नूतनीकरण करण्यापुरतेच काम अन्न व औषध प्रशासन करीत असते. मिठाई दुकानाची, पदार्थांची नमुने तपासणी यांची जबाबदारी या विभागाकडे आहे; मात्र, वैयक्तिक लाभापोटी पठाणी वसुली करून अन्न व औषध प्रशासन, पुरवठा अधिकारी व नगरपालिकेचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहेत.
नगरपालिका हद्दीत सर्वाधिक मिठाई दुकाने आहेत. आरोग्य कराच्या नावावर पालिका दरवर्षी लाखोंची वसुली करीत असली तरी नागरिकांच्या आरोग्याविषयी संबंधित विभाग कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
स्वीटमार्टच्या माध्यमातून आरोग्यास हानिकारक अशी मिठाईची शहरात विक्री होत आहे. संबंधित विभाग याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे.
- किशोर देशमुख,
नागरिक
भेसळयुक्त मिठाईच्या सेवनाने पोटातील विकार, आतड्यांचे रोग तसेच कॅन्सरसारखे आजार होण्याची दाट शक्यता असते.
- हेमंत रावळे,
वैद्यकीय व्यावसायिक