शाळेत माहिती देताना विद्यार्थ्यांना आधारकार्डची सक्ती नाही
By Admin | Updated: August 3, 2015 00:06 IST2015-08-03T00:06:27+5:302015-08-03T00:06:27+5:30
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ‘सरल’ योजनेंतर्गत भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन माहितीसाठी शालेय ...

शाळेत माहिती देताना विद्यार्थ्यांना आधारकार्डची सक्ती नाही
प्रधान सचिवांचे निर्देश : शिक्षणाधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद
अमरावती : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ‘सरल’ योजनेंतर्गत भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन माहितीसाठी शालेय विद्यार्थ्यांचा रक्तगट व आधार क्रमांकाची माहिती देणे अनिवार्य नसल्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांशी ‘व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे बोलताना स्पष्ट केले.
‘सरल’ योजनेमध्ये भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन माहितीमध्ये रक्तगट तसेच आधार क्रमांकाची माहिती देणे अनिवार्य असल्याचे सांगत अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना याविषयीच्या माहितीची सक्ती केली होती. याविषयीचे वृत्त प्रकाशित होताच रक्तगटाची माहिती सक्तीची नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. यानंतर आधारकार्डाचीही सक्ती नसल्याची बाब शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी गुरूवारी ‘व्हिसी’द्वारे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त शाळा, त्या शाळेमध्ये कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ‘सरल’ प्रणालीद्वारे आॅनलाईन भरण्याचे काम प्रत्येक शाळेत सुरू आहे यामुळे प्रत्येक संस्था, शिक्षक व विद्यार्थी यांची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. या अर्जामध्ये असलेल्या जवळपास ९० रकान्यांपैकी केवळ १५ मुद्याचीच माहिती भरणे अपेक्षित आहे. उर्वरित माहिती विद्यार्थ्यांच्या दाखल खारीज रजिस्टरमध्ये आधीच समाविष्ट असल्याने सहज उपलब्ध आहे. या माहितीसोबतच रक्तगट व आधार कार्डची माहिती सरल प्रक्रियेत विचारली आहे त्यामुळे अनेक शाळांनी रक्तगट तपासणी व आधार कार्डची सक्ती करून विद्यार्थ्यांना व पालकांना वेठीस धरले होते. रक्तगट लिहिणे ऐच्छिक असल्याचे समोर आल्यावर व त्याच दरम्यान शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प समन्वयक शिंदे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आधारकार्डची सक्ती नको असल्यास माहिती भरा, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. यामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
बचत खात्याची माहिती ऐच्छिक
जे विद्यार्थी शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता किंवा इतर आर्थिक सवलतीसाठी पात्र आहेत. अशाच विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती सरल प्रक्रियेत देणे अपेक्षित आहे. जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल, जे विद्यार्थी अशा सवलती किंवा आर्थिक लाभासाठी पात्र नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती देणेसुद्धा सक्तीचे नाही. त्यामुळे शाळांनी सरसकट विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची गरज नाही.