While Lottangan will visit Vaishnodevi, march to Gujarat | लोटांगण घालत घेणार वैष्णोदेवीचे दर्शन, गुजरातपर्यंत कूच
लोटांगण घालत घेणार वैष्णोदेवीचे दर्शन, गुजरातपर्यंत कूच

ठळक मुद्देनवस फेडण्याची भावना : अमरावतीच्या देवीदासचा व्हिडीओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जम्मू काश्मीर स्थित माता वैष्णोदेवीवर प्रत्येक हिंदूची आस्था आहे. येथील एक इसम आपल्या मुलाचा नवस फेडण्याकरिता वैष्णोदेवी गाठत आहे. मात्र, हा प्रवास विमान, रेल्वेने वा दुचाकीनेही नव्हे, तर चक्क लोटांगण घालून करीत आहे. अमरावतीच्या रतनगंज परिसरातील रहिवासी देवीदास वैष्णोदेवीकरिता लोटांगण घालत तीन महिन्यांपूर्वी रवाना झाला असून, सध्या तो गुजरातपर्यंत पोहोचला आहे.
देवीदास सिरपत थोरात नामक इसम रजनगंज स्थित तिसरा नागबाबा मंदिर झोपडपट्टी परिसरात राहतो. त्याने तीन महिन्यांपूर्वी घरापासून लोटांगण घालत प्रवासाला प्रारंभ केला. सोबतीला एका सायकलवर काही साहित्य आणि दुर्गेश व वैष्णवी ही दोन मुले पायी प्रवास करीत आहेत. सध्या गुजरातच्या गोध्रा परिसरातून राष्ट्रीय महामार्गावरून लोटांगण घालत पुढचा गाठणाऱ्या देवीदासचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला मदतसुद्धा देण्यात येत आहे. लोटांगण घालत तो ज्या गावातून जातो, तेथील रहिवासी भावनिक होऊन त्याचे कौतुक करीत आहेत. देवीदास सध्या गुजरातमधील महामार्गावरून लोटांगण घालत आहे. पावागड, अंबाजी, राजस्थान, हरियाणा, पंजाब असे मार्गक्रमण करीत ते वैष्णोदेवीला पोहोचतील. त्यासाठी ७ महिने लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.

लोकांकडून कौतुक, मदतीचा हात
रस्त्यावरील वाहन, खड्ड्यामुळे उखडलेली गिट्टी, टोकदार चुरी यांची पर्वा न करता लोटांगण घालत वैष्णोदेवीला निघालेले देविदास हे जेथून जातील, तेथील लोकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहेत. त्यामुळे शक्य तेवढी मदत त्यांच्याकडून केली जाते.

नवस फेडण्याचा आटापिटा
नवस फेडण्यासाठी देवीदास यांनी हा जीवघेणा आटापिटा केला आहे. दुर्गेश या त्यांच्या मुलाला विजेचा धक्का लागला होता. त्यामुळे त्याच्या डोक्याची कातडी निघून गेली होती. त्यावेळी त्याच्या मांडीचे मांस तेथे लावण्याची शस्त्रक्रिया करून त्याला वाचविण्यात आले. त्यावेळी देवीदास हे वैष्णोदेवीला लोटांगण घालून दर्शनाला येण्याचा नवस बोलले होते.

Web Title: While Lottangan will visit Vaishnodevi, march to Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.