देवेंद्र भुयारला निरोप देताना गहिवरले शेतकरी
By Admin | Updated: November 7, 2016 00:21 IST2016-11-07T00:21:48+5:302016-11-07T00:21:48+5:30
पंचायत समिती टेंभुरखेडा गणाचे सदस्य तथा युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता लढून ....

देवेंद्र भुयारला निरोप देताना गहिवरले शेतकरी
खामगावला रवानगी : शहीद स्मृती स्तंभाला नमन
वरूड : पंचायत समिती टेंभुरखेडा गणाचे सदस्य तथा युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता लढून त्यांना न्याय मिळून दिला. परंतु याचे बक्षीस म्हणून प्रशासनाने त्यांना तडीपारीची शिक्षा दिली. उपविभागीय अधिकारी मोर्शी यांनी जिल्ह्यातून योग्य त्या मार्गाने जाण्याचा आदेश दिला. आदेशाचे पालन करीत देवेंद्र भुयार हे बेनोडा येथील शहीद स्मृती स्तंभाला नमन करून जिल्हा सोडला. यावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते.
पंचायत समिती वरुडचे टेंभुरखेडा गणातून निवडून आलेले पंचायत समिती सदस्य तसेच युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी संत्रा, कपाशीपासून तर कृषीमालाला भाव देणे आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता वेळोवेळी शासनाला वेठीस धरून आंदोलने केलीत. परंतु आंदोलने करीत असताना पोलीस प्रशानाने गुन्हे दाखल करून तसा अहवाल उपविभागीय अधिकारी मोर्शी यांच्याकडे सादर करून तडीपारीचा प्रस्ताव पाठवून शिफारस केली होती. यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ख) अन्वये त्यांना तडीपार केले.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत देवेंद्र भुयार यांनी ५ नोव्हेंबर रोजी शहिदांच्या स्मृतीला अभिवादन करून जिल्हा सोडला.
यावेळी तालुक्यातील हजारो शेतकरी, संघटनेचे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, आदिवासी उपस्थित होते. बेनोड्याचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी भुयार यांना पोलीस सरंक्षणात एसटीत बसवून दिले. कुण्या नेत्याविरुद्ध तडीपारीचे आदेश काढण्याची ही तालुक्यातील पहिली घटना आहे. (तालुका प्रतिनिधी)
कष्टकऱ्यांकरिता चळवळ सुरुच ठेवू
प्रशासनाने माझ्याविरुद्ध कितीही कारवाया केल्या आणि तडीपार केले तरी शेतकऱ्यांकरिता एक कार्यकर्ता म्हणून मी उभी केलेली चळवळ अखंड सुरू ठेवणार आहे. माझ्याविरुद्ध कटकारस्थान रचून गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न हाणून पाडू. मी निर्दोष सिद्ध होणार याची मला खात्री आहे. माझ्या अनुपस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. कष्टकऱ्यांची चळवळ सुरूच ठेवा, असे आवाहन यावेळी भुयार यांनी उपस्थितांना केले.