आहे तरी कुठे आरोग्यसेवा?
By Admin | Updated: June 26, 2014 22:59 IST2014-06-26T22:59:30+5:302014-06-26T22:59:30+5:30
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरत असते. अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेवर वारंवार बोट ठेवले जाते. आता पावसाळा तोंडावर आलाय. म्हणजे रोगराई वाढणार. याच अनुषंगाने ‘लोकमत’च्यावतीने

आहे तरी कुठे आरोग्यसेवा?
रिक्त पदांचे ग्रहण : शहरासह ग्रामीण भागातही रूग्णांचे प्रचंड हाल
अमरावती : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरत असते. अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेवर वारंवार बोट ठेवले जाते. आता पावसाळा तोंडावर आलाय. म्हणजे रोगराई वाढणार. याच अनुषंगाने ‘लोकमत’च्यावतीने जिल्ह्यातील आरोेग्य यंत्रणेचे गुरूवारी ‘स्टिंग आॅपरेशन’ करण्यात आले. यात जिल्ह्यातील ढेपाळलेल्या आरोग्य यंत्रणेची लक्तरे समोर आली. जिल्हा सामान्य रूग्णालयासह ग्रामीण भागातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधीक्षकांसह अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले. साफसफाई, पाणीपुरवठा, औषधींचा साठा आणि कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळे रूग्णांचे होणारे हालही प्रकर्षाने दिसून आले.
इर्विनची सीटी स्कॅन, लिफ्ट बंद
अमरावती : सतत वादग्रस्त ठरणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवेबाबत रुग्णांची ओरड कायम आहे. दुसरीकडे या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिकांची सुमारे ७५ पदे रिक्त आहेत. रुग्णालयातील सीटी स्कॅन व लिफ्टदेखील बंद आहे.
जिल्ह्याच्या रुग्णसेवेचा भार सांभाळणाऱ्या इर्विनमध्ये डॉक्टरांची वानवा असल्याने आरोग्य सेवा देताना दमछाक होत असल्याचे येथे चित्र आहे. वर्ग-१ चे १५ पदे रिक्त आहेत. दररोज ८०० ते ९०० बाह्यरुग्ण तपासणी तर वॉर्डात ३५० ते ४०० रुग्णसेवा दिली जाते. मात्र तोकडे मनुष्यबळ असल्याने येथील प्रमुखांना रुग्णसेवा कशा पुरवाव्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे. वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी, स्टॉप नर्स व अधिपरिचारिका या पदांचा अनेक वर्षांपासून वानवा असल्याची माहिती आहे. अधिपरिचारिकांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना योग्य सेवा देणे दुरापास्त झाले आहे.
चांदूरच्या रूग्णालयाला घाणीचा वेढा
स्थानिक ग्रामीण रूग्णालय रिक्त पदे, अपुऱ्या सोर्इंमुळे शोभेची वास्तू ठरल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान स्पष्ट झाले.
या रुग्णालयात २६ पदे आहेत. त्यातील महत्त्वाची ३ पदे रिक्त आहेत. गुरूवारी 'लोकमत'ने रूग्णालयाला भेट दिली असता वैद्यकीय अधीक्षकांची खुर्ची रिकामी आढळली. ३ पैकी दोनच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. तर संध्या साळकर या एकमेव वैद्यकीय अधिकारी आंतर व बाह्यरुग्ण विभाग सांभाळत होत्या. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी त्या निघून गेल्यानंतर अन्य रुग्णांना ताटकळत बसावे लागले. रूग्णालयातील सहायक अधीक्षकांचे पद रिक्त आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञांचे स्थानांतरण झाले. मात्र, अद्याप ती जागा भरण्यात आली नाही. परिणामी इतर कर्मचाऱ्यांना हा विभाग सांभाळावा लागत आहे. परिचारिकेचेही एक पद रिक्त आहे. रूग्णालयात पाण्याची टाकी आहे. मात्र, त्यात पाणीच राहात नाही. वॉटरकुलर बंद आहे. याबाबत तक्रार केल्याने येथे पाण्याचे माठ ठेवण्यात आले आहेत.
औषधींचा मर्यादित साठा उपलब्ध असून खोकल्याचे औषध मागील सहा महिन्यांपासून उपलब्ध नाही. जेथून या औषधांचा पुरवठा होतो तेथेच ती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.