जप्त केलेले धान्य गेले कुठे?
By Admin | Updated: December 7, 2014 22:43 IST2014-12-07T22:43:41+5:302014-12-07T22:43:41+5:30
येथील एका शासकीय धान्य दुकानात धान्य वितरण विभागाने धाड घालून ७ लाख ६६ हजार रुपये किमतीचे धान्य जप्त केले. परंतु हे धान्य ठेवले कुठे, असा सवाल पीपल्स रिपब्लिकन

जप्त केलेले धान्य गेले कुठे?
बडनेरा : येथील एका शासकीय धान्य दुकानात धान्य वितरण विभागाने धाड घालून ७ लाख ६६ हजार रुपये किमतीचे धान्य जप्त केले. परंतु हे धान्य ठेवले कुठे, असा सवाल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष सुरेंद्र टेंभुर्णे यांनी केला. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
स्थानिक नवीवस्तीतील आठवडी बाजार येथे नंदलाल अग्रवाल यांचे सरकारी स्वस्त धान्य दुकान आहे. अन्न धान्य वितरण कार्यालयाने २९ नोव्हेंबर रोजी या दुकानात धाड घालून ७ लाख ६६ हजार रुपये किमतीचे गहू, तांदूळ व साखर जप्त केली. हे धान्य दुकान सील करुन ठेवण्यात आल्याचे पुरवठा निरीक्षक ठाकरे यांनी सुरेंद्र टेंभुर्णे यांना सांगितले. जप्त केलेले धान्य हे शासकीय धान्य गोदामात ठेवणे आवश्यक असताना आजपर्यंत हे धान्य या गोदामात ठेवण्यात आले नाही, असा आरोप पीरिपाचे टेंभूर्णे यांनी जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्यांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच शासनाकडून प्रमाणित करण्यात आलेल्या धान्य दुकानातील भेट पुस्तिकेतही या धाडसत्राची नोंद करण्यात आलेली नाही. तसेच कारवाईसाठी पोलिसांचीही मदत घेण्यात आली नाही.
ही कारवाई म्हणजे सर्व गौडबंगाल असल्याचे दिसत असून यासंदर्भात सखोल चौकशी करुन दोषींना निलंबित करण्याची मागणीही सुरेंद्र टेंभुर्णे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानदार दोषी आढल्यास त्याचा परवानाही रद्द करण्याची मागणी या निवेदनाव्दारे केली आहे. (शहर प्रतिनिधी)