रखडलेल्या शहानूर रस्त्याच्या कामाला कधी होणार सुरुवात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:11 IST2021-04-03T04:11:55+5:302021-04-03T04:11:55+5:30
दोन आमदारांनी दिले होते आश्वासन : ग्रामस्थांची कसरत पथ्रोट : शहानूर धरणाच्या बांधकामाला ३५ वर्षे पूर्ण झाली. बांधकामाच्या सुरुवातीला ...

रखडलेल्या शहानूर रस्त्याच्या कामाला कधी होणार सुरुवात?
दोन आमदारांनी दिले होते आश्वासन : ग्रामस्थांची कसरत
पथ्रोट : शहानूर धरणाच्या बांधकामाला ३५ वर्षे पूर्ण झाली. बांधकामाच्या सुरुवातीला शहानूर विभागाने पांढरी ते शहानूर असे नऊ किमी अंतर असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून पूर्ण केले होते. ३५ वर्षांपासून या रस्त्यावरुन मुरुम, रेतीचे ट्रक, ट्रॅक्टर अशा जड वाहनांच्या येरझारा सुरू असतात. परिणामी, या रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली दिसते. त्यामुळे या रस्त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते.
तत्कालीन आमदार रमेश बुंदेले यांनी रस्त्याच्या कामाचे थाटामाटात उद्घाटन केले होते. त्यामुळे शेतकरी व शहानूर ग्रामस्थआंच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, सहा वर्षांतही रस्ता न झाल्याने नागरिकांना भ्रमनिरास झाला. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी शहानूर (वागडोह) येथील पोलीस पाटील सुभाष काकड, नागरिक व पथ्रोट येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार बळवंत वानखडे यांनी रस्त्याबाबत निवेदन दिले. त्यांनी नागरिकांना रस्ता दुरुस्तीबाबत आश्वासन दिले. निवेदनाला चार महिने पूर्ण झाले असून, रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झालेली दिसत नाही. त्यामुळे आताही जनतेचा भ्रमनिरास तर होणार नाही ना, अशी चर्चा आहे.
कोट
शहानूर रस्त्याच्या बांधकामाला ३५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले. आजी-माजी आमदारांना निवेदनातून रस्त्याबाबत अवगत करून दिले. रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
- सुभाष काकड, पोलीस पाटील, शहानूर (वागडोह)