‘व्हीसीएमएफ’ला केव्हा येणार जाग?

By Admin | Updated: May 3, 2017 00:15 IST2017-05-03T00:15:52+5:302017-05-03T00:15:52+5:30

शासकीय तूर खरेदी केंद्र बंद झाल्यावर १४ हजार ५९८ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले.

When will VCMF wake up? | ‘व्हीसीएमएफ’ला केव्हा येणार जाग?

‘व्हीसीएमएफ’ला केव्हा येणार जाग?

६ दिवसांनी उपरती : सर्वच केंद्रांवर चार सदस्यीय समिती नियुक्त
अमरावती : शासकीय तूर खरेदी केंद्र बंद झाल्यावर १४ हजार ५९८ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. त्यांची २.३४ लक्ष पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील सर्वच ११ केंद्रावर मोजणीचा खेळखंडोबा असल्याने मोजणीसाठी आणखी किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा उपनिबंधकांनी प्रत्येक केंद्रावर चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. आता तरी खरेदीदार यंत्रणांनी विशेषत: व्हीसीएमएफने तूर मोजणीचा वेग वाढवावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र २२ एप्रिल रोजी शासनाने बंद केल्यानंतर मार्केट यार्डात नोंद झालेली २ लाख ३४ हजार २९७ पोते तूर पडून होती. ही शिल्लक तूर खरेदी करण्याचा निर्णय २७ एप्रिल रोजी उशीरा घेण्यात आला. २८ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन् महासंघाने काही केंद्रांवर खरेदी सुरू केली व दुसऱ्याच दिवशी अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, दर्यापूर आणि वरूड येथे शिल्लक असलेल्या तूर खरेदीला सुरूवात केली. मात्र, पडताळणी समितीच्या अहवालाचा अडथळा असल्याने ज्या टोकनला समितीने मंजुरी दिली ती तूर खरेदी करण्यात आली. सद्यस्थितीत डीएमओद्वारा जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ८३३ शेतकऱ्यांची १७ हजार ४९६ क्विंटल तूर मोजण्यात आली.

कशी करणार खरिपाची तयारी ?

अमरावती : अद्याप एक लाख ७८ हजार ४९० क्विंटल तूर डीएमओच्या अखत्यारीतील केंद्रांवर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.
यातुलनेत विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनची (व्हीसीएमएफ) स्थिती मात्र गंभीर आहे. ग्रेडर नाही, बारदान्याचा अभाव आदी कारणांमुळे केंद्रावरील तूर मोजणी रखडली. सद्यस्थितीत चांदूररेल्वे, अमरावती व मोर्शी केंद्रावर ६९ शेतकऱ्यांची एक हजार ३४२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मोजणीची अशीच स्थिती राहिल्यास खरिपाचा हंगाम केंद्रांवरच काढावा का, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यापूर्वी विक्री झालेल्या तुरीचे चुकारे अद्याप यंत्रणांनी दिले नाहीत. यार्डात शिल्लक असलेल्या तुरीची मोजणी होण्यास किमान महिना लागणार आहे. यंदाचा खरीप महिन्यावर येऊन ठेपला आहे. खरीप पूर्व मशागत, पेरणीचा खर्च कसा करावा, या विवंचनेत शेतकरी आहेत.

‘व्हीसीएमएफ’च्या मागणीनुसार समिती गठित
विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनद्वारा २७ एप्रिलला शासन निर्णयाप्रमाणे ग्रेडिंग करणाऱ्या प्रतिनिधींची गरज असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे १ मे रोजी केली व त्यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा उपनिबंधकांनी प्रत्येक केंद्रावर समिती नियुक्त केली. यामध्ये सहायक निबंधक समिती प्रमुख राहणार आहेत तर बाजार समिती सचिव व कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समितीमध्ये समावेश आहे.

चांदूररेल्वेमध्ये तूर खरेदीला सुरुवात
चांदूर रेल्वे : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर खरेदीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. २२ एप्रिलपर्यंत यार्डातील व टोकन दिलेली तूर खरेदी करण्यात येणार आहे. तुरीचे ग्रेडिंग क रण्यासाठी सहायक निबंधक, कृषी अधिकारी व बाजार समिती सचिव यांची समिती नेमण्यात आली आहे. मंगळवारी ग्रेडिंग करून सब एजंट विदर्भ को-आॅप मार्केटिंगचे अधिकारी तुरीचे मोजमाप करीत आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत ४०० ते ५०० क्विंटल तुरीचे ग्रेडिंग करून मोजमाप झाल्याचे सांगण्यात आले. बाजार समितीमध्ये शिल्लक असलेल्या तुरीची मोजणीला आठवडा लागू शकतो, असा अंदाज आहे.
 

Web Title: When will VCMF wake up?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.