ट्रान्सपोर्टनगरातील जड वाहनांची वाहतूक केव्हा थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:49+5:30
ट्रान्सपोर्टनगरात अनेक व्यावसायिकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यामुळे शेकडो ट्रक येथून ये-जा करतात. मात्र, अपघात होऊ नये याची काळजी ट्रकचालकांकडून घेतली जात नाही. रात्री शेकडो ट्रक या मार्गावर उभे राहतात. जड वाहनांना शहरात दुपारी २ ते ४ वाजतादरम्यानच परवानगी आहे. इतर वेळातसुद्धा या मार्गावर जडवाहने क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करीत असल्याची नागरिकांची ओरड आहे.

ट्रान्सपोर्टनगरातील जड वाहनांची वाहतूक केव्हा थांबणार?
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जमील कॉलनी ते धरमकाटा मार्गावर अनधिकृतपणे ट्रकच्या रांगा लागतात. दिवसभर जडवाहतूक होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याच मार्गावर अनेक अपघात घडले असून, वर्षभरात ४ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. याला पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
ट्रान्सपोर्टनगरात अनेक व्यावसायिकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यामुळे शेकडो ट्रक येथून ये-जा करतात. मात्र, अपघात होऊ नये याची काळजी ट्रकचालकांकडून घेतली जात नाही. रात्री शेकडो ट्रक या मार्गावर उभे राहतात. जड वाहनांना शहरात दुपारी २ ते ४ वाजतादरम्यानच परवानगी आहे. इतर वेळातसुद्धा या मार्गावर जडवाहने क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करीत असल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे इतर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याकडे वाहतूक पोलिसांचे व नागपुरीगेट पोलिसांचे कायम दुर्लक्ष दिसून येत आहे.
येथे महापालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून अमरावती महापालिका ट्रक टर्मिनल्स सभागृह उभारण्यात आले. अंदाजे दोन एकर जागेत या संकुलाच्या मागे ट्रकच्या पार्किंगसाठी जागेची व्यवस्था केलेली आली. परंतु येथे पार्किंगचे पैसे घेत असल्यामुळे अनेक ट्रकचालक रस्त्यावर वाहन उभे करतात. त्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या व्यापारी संकुलासमोरच पॅरेडाईज कॉलनीकडे वळण रस्त्याच्या ठिकाणी अनेकांची अपघात झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. याच ठिकाणी गत वर्षी एक जण ट्रकने चिरडला गेला.
या मार्गावरून दिवसभर जड वाहनांना बंदी असावी. ट्रान्सपोर्टनगरात रस्त्यावर एकही ट्रक उभा राहू नये. याच ठिकाणी अपघातात एका शिक्षक महिलेला पाय गमवावे लागले. मी नगरसेविका असताना येथे टर्मिनल्स कॉम्पलेक्स झाले. येथे याचा ट्रकचालक उपयोग करीत नाहीत.
- लुबना तनवीर नवाब,
माजी नगरसेविका
नागपुरी गेट हद्दीत पाच जणांचा मृत्यू
नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान पाच अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला. एकूण १३ अपघाताच्या घटना घडल्यात. नागपुरीगेट ते ट्रान्सपोर्टनगर मार्गावर अलिशान मॅरेज हॉलनजीक चौघांचा अपघाती मृत्यू झाला. इतर ठिकाणी आठ अपघाताची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या मार्गावरील अवैध पार्किंग हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.