केव्हा परतणार माझी प्रणिता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:18+5:30

धामणगाव रेल्वे शहरातील स्व. दादाराव अडसड पटांगणात जुना धामणगाव येथील १७ वर्षीय विद्यार्र्थिनीचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. हल्लेखोर सागर तितुरमारे यानेही स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या हत्येची माहिती कळताच तिचे वडील नखशिखांत हादरले. एका क्षणात त्यांची लाडकी लेक सोडून गेली.

When will my return? | केव्हा परतणार माझी प्रणिता?

केव्हा परतणार माझी प्रणिता?

ठळक मुद्देवडिलांचा आक्रोश : दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने समाजात दहशत

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : दररोज सकाळी चहा, नाष्टा अन् रात्री जेवण तीच तयार करायची. आजही सकाळी मी शेतात निघालो तेव्हा बाबा तुम्ही लवकर घरी या, असे सांगून ती सकाळी कॉलेजला गेली. मात्र, परतली नाही. कानी आली तिच्या खुनाची माहिती अन् हातात तिचे पार्थिव. आता माझी प्रणिता केव्हा परतणार, हा पित्याचा आक्रोश मन हेलावणारा होता. तिची जन्मदात्री तर नि:शब्द होऊन शून्यात हरविली होती. जुना धामणगाव परिसरातील प्रणिता हिच्या घरात केवळ आक्रोश होता.
धामणगाव रेल्वे शहरातील स्व. दादाराव अडसड पटांगणात जुना धामणगाव येथील १७ वर्षीय विद्यार्र्थिनीचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. हल्लेखोर सागर तितुरमारे यानेही स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या हत्येची माहिती कळताच तिचे वडील नखशिखांत हादरले. एका क्षणात त्यांची लाडकी लेक सोडून गेली.
अवघ्या दीड तासांपूर्वी घराबाहेर पडलेल्या प्रणिताचे कलेवरच घरी पोहोचले. ते पाहून प्रणिताच्या आईने हंबरडा फोडला. मात्र, अनावर दु:खाने त्या नि:शब्द झाल्या. दोन दिवसांपूर्वीच माहेरी आलेल्या प्रणिताच्या मोठ्या बहिणीला अश्रू आवरेनासे झाले होते.
आरोपी सागरच्या एकतर्फी प्रेमाचा सुगावा प्रणिताच्या कुटुंबाला लागला होता. मात्र, तो एवढ्या थराला जाईल, याची सुतराम कल्पना कुणालाही नव्हती. प्रणिताच्या समवयस्क मैत्रिणी तर या घटनेने पार हादरून गेल्या होत्या.

‘ती’ ठरली तक्रार पेटीची
साक्ष
दत्तापूर पोलीस ठाण्याकडून तीन दिवसांपूर्वी प्रणिता शिकत असलेल्या हायस्कूलमध्ये तक्रारपेटी लावली. तक्रार पेटी लावण्यात यावी, या मागणीसाठी प्रणिताने पुढाकार घेतला होता, हे येथे उल्लेखनीय.

वडिलांनाही दिली होती धमकी
दत्तापूर येथील रहिवासी असलेल्या सागरच्या अतिरेकी वागण्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते. काही दिवसांपासून सागर आपल्याला त्रास देत असल्याची माहिती प्रणिताने आपल्या वडिलांना दिली होती. त्यामुळे तिच्या वडिलांनी सागरविरुद्ध तक्रार दिली होती. मात्र, सागरने त्यांनाच जिवे मारण्याची धमकी दिली होती. दत्तापूर पोलिसांनी सागरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. काही दिवस सागर धामणगाव शहर सोडून इतरत्र गेला होता. सोमवारी माताजी मंदिरालगत सागर व प्रणिताची सकाळी भेट झाली. बाचाबाची झाल्यानंतर हत्येचे प्रकरण घडले.

जुना धामणगाव येथील प्रणिताच्या कुटुंबाकडे केवळ दोन एकर शेती आहे. तिचे आई-वडील शेतमजूर आहेत. ती धामणगावातील एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावीला शिकत होती. घर सांभाळून अभ्यास ही तिची दैनंदिनी. मात्र, काही महिन्यांपूर्वी दत्तापूर येथील सागर तितुरमारे याने तिला त्रास देणे सुरु केले. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीचीच. दररोज रस्त्यात आडवा येणे, पाठलाग करणे असा त्रास असह्य झाल्याने पोलिसांत सागरविरुद्ध तक्रारही नोंदविण्यात आली. मात्र, काही दिवस शांत राहिल्यानंतर त्याचे एकतर्फी प्रेम हिंसाचारात बदलले. प्रेमात आंधळा होऊन सागरने प्रणिताला संपविले अन् तोही मृत्यूशी झुंज देत आहे.
 

Web Title: When will my return?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून