चुर्णीच्या पळपुट्या डॉक्टरांवर कारवाई केव्हा?
By Admin | Updated: July 5, 2015 00:16 IST2015-07-05T00:16:29+5:302015-07-05T00:16:29+5:30
हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करून ३० जून रोजी निघून गेलेल्या चुर्णी येथील ग्रामीण रूग्णालयातील पळपुट्या दोषी

चुर्णीच्या पळपुट्या डॉक्टरांवर कारवाई केव्हा?
युवक काँग्रेसचा सवाल : पालकमंत्र्यांना दिले निवेदन
अमरावती : हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करून ३० जून रोजी निघून गेलेल्या चुर्णी येथील ग्रामीण रूग्णालयातील पळपुट्या दोषी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केव्हा होणार, असा सवाल भारतीय युवक काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना शनिवारी निवेदन दिले.
चुर्णी येथील ग्रामीण रूग्णालयात अनेक समस्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे येथील स्त्रीरोगतज्ज्ञ वैशाली गांजेवार या रूजू झाल्यापासून रूग्णालयात एकदाही आल्या नसल्याचे युकाँच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. शिवाय रूग्णालयातील औषध निर्माण अधिकारी पद तीन वर्षांपासून रिक्त आहे. एक्स-रे टेक्निशियनचे एक पद, सहायक अधीक्षक एक पद, कनिष्ठ लिपिक २ पदे, सफाई कामगारांची दोेन पदे रिक्त आहेत.
या रूग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छ पाण्याची सोय नाही. शिवाय येथील रूग्णवाहिका बंद अवस्थेत आहे. येथील अधिपरिचारिकांची सात पदे अद्यापही रिक्तच आहेत.
थ्री फेज जनरेटरची सुविधा नाही. लाखोंची सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे पळून गेलेल्या दोषी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भारतीय युवक काँग्रेसद्वारे करण्यात आली आहे.
आठवडाभरात या समस्या न सोडविल्यास युकाँद्वारे चुर्णी येथील रूग्णालयातच आंदोलनास सुरूवात केली जाईल, असा इशारा युकाँचे राहुल येवले, भय्या पवार, सागर देशमुख, स्वप्निल कोकाटे, बबलू बोबडे, गौरव काले, तुषार बायस्कर, समीर जवंजाळ, हरिष मोरे, राजा बागडे , समीर देशमुख, सागर व्यास, मुकेश लालवनी, सागर यादव, नीलेश कडू, पियुष मालवीय आदींनी निवेदनातून दिला आहे. (प्रतिनिधी)