सरकीची दरवाढ, कापसाची केव्हा ?
By Admin | Updated: March 12, 2017 00:33 IST2017-03-12T00:33:41+5:302017-03-12T00:33:41+5:30
यंदाच्या हंगामात तूर, सोयाबीन भाव कोसळले असताना कापूस मात्र हमीच्या वरच आहे.

सरकीची दरवाढ, कापसाची केव्हा ?
शेतकऱ्यांना आशा : निर्यातीसह देशांतर्गत उद्योगात वाढती मागणी
अमरावती : यंदाच्या हंगामात तूर, सोयाबीन भाव कोसळले असताना कापूस मात्र हमीच्या वरच आहे. कापसाच्या गाठींची होत असलेली निर्यात, देशांतर्गत उद्योगात कापसाला असलेली मागणी व सरकीची होत असलेली भाववाढ यामुळे कापसाला किमान सहा हजारपर्यंत भाव मिळायला पाहिजे. मात्र त्या दराच्या आत कापसाचे भाव स्थिरावले असल्याने, कापसाला किमान सहा हजार भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.
कित्येक हंगामाच्या तुलनेत यंदा प्रथमच कापसाच्या भावातील तेजीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सद्यस्थितीत कापसाच्या हंगामाला सुरूवात झाली. गतवर्षी दिवाळीला कापूस ५८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता. मात्र, जसजशी आवक वाढली तसतशी कापसाचा भाव कमी होत आहे. मात्र तरीही हा भाव शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा जास्तच आहे. मात्र, ज्या प्रमाणात सरकीचे भाव वाढत आहे, त्याप्रमाणात कापसाला भाव मिळत नसल्याची शेतकऱ्यांची खंत आहे. सद्यस्थितीत सरकीचे भाव २५०० ते २७०० रुपये क्विंटलपर्यंत आहे. त्यामुळे कापसाला किमान ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावयास पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशांतर्गत कापसाचे उत्पादन अधिक आहे व किमान ३ लाख क्विंटलपेक्षा अधिक गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत दीड लाख क्विंटल गाठींची खरेदी झालेली आहे.
यंदा कापसाचे सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्र व गुजरातमध्ये होत आहे. या खालोखाल पंजाब, राजस्थान, हरियाणा, तेलंगना व आंध्रप्रदेशात देखील उत्पादन होत आहे. देशांतर्गत उद्योगात वाढती मागणीसह परदेशातदेखील कापसाची मागणी वाढली आहे.
मागील वर्षी कापसाच्या गाठी शिल्लक होत्या मात्र, यंदा तशी स्थिती नाही. चीन, पाकिस्तान व बांगलादेशातदेखील कापसाची निर्यात सुरू झाली आहे व याचा परिणाम होऊन सरकीचे भाव वधारले आहे. मात्र, तुलनेत ५५०० ते ५८०० रुपये दरम्यान स्थिरावलेले कापसाचे भाव हे किमान सहा हजारापर्यंत पोहचतील असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला आहे. सोयाबीन, तुरीचे भाव कमालीचे घसरल्याने शेतकरी आधीच आर्थिक कोंडीच आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना कापसाचा आधार राहिला होता. व गतवर्षीपेक्षा यंदा भावदेखील समाधानकारक आहे. मात्र ज्याप्रमाणात सरकी व ढेपीची भाववाढ होत आहे. त्यातुलनेत कपाशीला भाव नाही.
दीड दशकांपासून
पणनची केंदे्र नावालाच
लांब धाग्याच्या कापसाला सर्वाधिक असा ४०५० रुपये क्विंटल यंदाचा हमी भाव आहे. मागील वर्षी केवळ ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, खासगी बाजारात यापेक्षा अधिक भाव आहे. त्यामुळे शेतकरी पणनच्या खरेदी केंद्राकडे फिरकत नाहीत. किंबहुना दीड दशकापासून पणनच्या खरेदी केंद्रांची दैनावस्था आहे. जोवर हमीभावात वाढ होत नाही, तोवर अशीच स्थिती राहणार आहे.
देशाच्या बाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. गाठीची निर्यातदेखील सुरू झाली आहे. सरकीच्या भावातही तेजी आली आहे. यामुळे कापसाच्या भावात थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र परदेशात पाहिजे तशी मागणी नाही.
- संजय राठी, कापूस व्यावसायी