-तर नॉयलॉन मांज्यामुळे गेला असता तरूणीचा जीव
By Admin | Updated: October 13, 2016 00:38 IST2016-10-13T00:38:08+5:302016-10-13T00:38:08+5:30
शिकवणी आटोपून मोपेड वाहनाने घरी जात असताना अचानक चेहऱ्यावर नॉयलॉनचा मांजा आला

-तर नॉयलॉन मांज्यामुळे गेला असता तरूणीचा जीव
पोलिसांची कारवाई शून्य : घातक मांजामुळे विद्यार्थिनी जखमी
अमरावती : शिकवणी आटोपून मोपेड वाहनाने घरी जात असताना अचानक चेहऱ्यावर नॉयलॉनचा मांजा आला आणि ती विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. रविवारी सायंकाळी रामपुरी कॅम्प परिसरात ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत विद्यार्थिनीचे प्राण वाचले. शहरात नॉयलॉनच्या मांज्याची सर्रास विक्री होत असतानाही अद्यापपर्यंत पोलिसांची कारवाई मात्र शून्य आहे. या मांज्यामुळे एखाद्याचा जीव जाण्याची प्रतीक्षा तर पोलीस प्रशासन करीत नाही ना, असा प्रश्न आता अमरावतीकरांना पडला आहे.
नॉयलॉनच्या मांज्याने पतंग उडविण्यास शासनाने बंदी घातली आहे. राज्यभरात ही बंंदी कायम आहे. हा मांजा पक्षी व नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. नॉयलॉनच्या मांजामुळे अनेक जण जखमी झाल्याचे यापूर्वी देखील निदर्शनास आले आहे. हा प्रकार धोकादायक असतानाही शहरातील काही ठिकाणी सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री केला जात आहे. शहरातील नमुना, साबणपुरा, रामपुरी कॅम्प आदी ठिकाणी मांजा व पतंगविक्रीची प्रतिष्ठाने आहेत. यापैकी काही ठिकाणचे व्यापारी सर्रासपणे नॉयलॉनच्या मांजाची विक्री सुद्धा करीत आहेत.
यामांजात अडकून आजवर अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. त्यातच रविवारी रामपुरी कॅम्प परिसरात एक विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. तो मांजा विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आल्याने तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्यात. जर तो मांजा गळयावर आला असता तर तिचा गळा चिरला गेला असता. चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने तिला रक्तबंबाळ अवस्थेत इर्विनला दाखल करण्यात आले होते. यापूर्वीच्या घटनामध्येही काही युवक मांज्यामुळे जखमी झाले आहेत. मात्र, त्याकडे गांभिर्याने बघितले गेले नाही. त्यामुळे हिच का पोलिसांची कर्तव्यदक्षता? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नॉयलॉनचा मांजाची खुलेआम विक्री होत असतानाही पोलीस प्रशासन गप्प का, मांज्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ का, असा सवाल अमरावतीकर नागरिकांच्यावतीने उपस्थित केला जात आहे.
नॉयलॉन मांजाची शहरात विक्री होत असेल, तर त्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश संबंधित ठाण्याला देण्यात येतील.
- दत्तात्रय मडंलिक,
पोलीस आयुक्त.