शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन केव्हा ?

By Admin | Updated: September 11, 2016 00:14 IST2016-09-11T00:14:02+5:302016-09-11T00:14:02+5:30

मागील आठवड्यात गौरी पूजन दरम्यान नागपूर जिल्ह्यात चार मुलींचा तलावात बुडून मृत्यू व त्यापूर्वी देशपातळीवर पाहता नेपाळ येथे झालेला...

When is disaster management in schools? | शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन केव्हा ?

शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन केव्हा ?

चिमुकले असुरक्षित : विद्यार्थी, शिक्षकांना प्रशिक्षण आवश्यक
गजानन मोहोड अमरावती
मागील आठवड्यात गौरी पूजन दरम्यान नागपूर जिल्ह्यात चार मुलींचा तलावात बुडून मृत्यू व त्यापूर्वी देशपातळीवर पाहता नेपाळ येथे झालेला भूकंप, पेशावर शाळेमध्ये मुलांवर झालेला दहशतवादी हल्ला या सर्व पार्श्वभूमिवर शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.
देशात कुठेही भूकंप झाला की अनेकदा जिल्ह्यात ५ ते ६ ठिकाणी धक्के जाणवतात. त्यामुळे शाळांमध्ये चिमुकले असुरक्षित असल्याची भावना निर्माण होऊन पालकांचे धाबे दणाणले. आपत्ती कधी पूर्वसूचना देऊन येत नाही. त्यामुळे बचाव कसा करावा यासाठी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाची गरज आहे.
अमरावती जिल्हा हा आपत्तीप्रवण जिल्हा आहे. जिल्ह्यात वर्षभर आग, पूर, वीज, अतिवृष्टी, पाऊस, गारपीट आदी आपत्ती ओढवतात. शिक्षण विभागाने यापूर्वी काही मोठ्या शहरातील शाळांना अग्निशमन यंत्रे दिलीत, मात्र याविषयीचे प्रशिक्षण दिलेले नाही. मेळघाटासह अनेक ठिकाणी यापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना द्यायची गरज निर्माण झाली आहे. किंबहुना प्रशिक्षणासमवेत पाठ्यपुस्तक याविषयीचा धडा असावा, अशी भावनाही पालकांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या २,८१४ शाळा आहे. यामध्ये किमान ३ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात जोवर त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण धडे देणार नाही तोवर हे चिमुकले असुरक्षित आहेत.
अनेकदा शाळेत घडलेला एखादा अपघात विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्याची शक्यता असते, शाळेची भिंत, छत कोसळणे, काही लावण्याने जखम होणे यासारख्या घटना वारंवार घडतात. याशिवाय शाळेमध्ये जाता-येताना रस्त्यावर एखादा अपघात घडल्यास किंवा घरात, आजूबाजूला काही अपघात झाल्यास विद्यार्थी त्यांना येत असलेल्या प्रथमोपचाऱ्याच्या प्रशिक्षणाने उपचार करू शकतात. परदेशात प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक शाळेत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात असताना आपल्या देशात का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात २,८१४ शाळा
जिल्ह्यात महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या २८१४ शाळा आहेत. यामध्ये अचलपूर २५७, अमरावती १६३, अंजनगाव सुर्जी १७३, भातकुली १४८, चांदूरबाजर २०१, चिखलदरा २२३, चांदूररेल्वे १०५, दर्यापूर २२४, धारणी २१३, धामणगाव रेल्वे १२९, मोर्शी १७१, नांदगाव खंडेश्वर १६३, तिवसा ११६, वरूड १९५, महापालिका ३३३ शाळा आहेत.

राज्यातील शाळांमध्ये
सव्वा कोटी विद्यार्थी
राज्यात पहिली ते पाचवीपर्यंत ७४ लाख २० हजार ४८२, सहावी ते आठवीपर्यंत ४९ लाख ५४ हजार ४१५ असे एकूण १ कोटी २३ लाख ७४ हजार ८९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे शिक्षण विभागाने देणे गरजेचे आहे.

प्रथमोपचार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण हवेच
शालेय स्तरापासून तर विद्यार्थ्यांना प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिल्यास पुढील आयुष्यात त्यांना याचा भरपूर लाभ होऊ शकतो. आरोग्य क्षेत्रात एकीकडे दिवसागणिक नवनव्या तंत्रज्ञानाची भर पडत असताना आपल्या शिक्षण पद्धतीत मात्र प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापनाचे, आपत्कालीन प्रशिक्षणाचा समावेश नाही, ही दुर्देवाची बाब आहे.

शालेय स्तरावरील इयत्ता ८ वी पर्यंतच्या मुलांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण द्यायला हवे, यामध्ये किमान प्राथमिक उपचार रुग्णवाहिकेला बोलाविणे, रुग्णाला मानसिक आधार देणे आदी बाबींचा समावेश असायला हवा.
- ज्ञानेश्वर शेळके,
सीईओ, आपत्कालीन व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य.

Web Title: When is disaster management in schools?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.