‘त्या ’ २६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची बडतर्फी केव्हा ?
By Admin | Updated: May 27, 2016 00:37 IST2016-05-27T00:37:57+5:302016-05-27T00:37:57+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या २६ अधिकारी-कर्मचऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश शासन दरवर्षी धूळखात पडले.

‘त्या ’ २६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची बडतर्फी केव्हा ?
लाचलुचपत प्रकरणात लालफीतशाही : शिक्षा होऊन मुहूर्त मिळेना
अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या २६ अधिकारी-कर्मचऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश शासन दरवर्षी धूळखात पडले. त्याची बडतर्फी लालफीतशाहीत अडकली आहे.
विशेष म्हणजे लाच घेतल्याचे सिद्ध होऊन या सापळा प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र त्यानंतर या लोकसेवकांना बडतर्फ करण्यात आलेली नाही.
अद्यापपर्यंत शिक्षा झालेल्या सापळा प्रकरणात बडतर्फ न केलेल्या आरोपी सेवकांची खातेनिहाय, वर्गनिहय व परिक्षेत्रनिहाय माहिती एसीबीने जाहीर केली आहे. यामध्ये वर्ग १ चा एक अधिकारी, वर्ग २ चे ६ अधिकारी तर वर्ग ३ च्या सर्वाधिक १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय वर्ग ४ आणि अन्य एका लोकसेवकालाही अद्यापर्यंत बडतर्फ करण्यात आलेले नाही.
राज्यातील ज्या २६ आरोपी लोकसेवकांना (अधिकारी-कर्मचारी) बडतर्फ करण्यात आलेले नाही त्यात महसूल, भूमि अभिलेख व नोंदणी विभागातील पाच, सार्वजनिक आरोग्य विभाग ३, ऊर्जा विभाग, मराविविकं ३, व वैद्यकीय शिक्षण , उद्योग, उर्जावर व कामगार, म्हाडा, विक्रीकर, समाज कल्याण, नगर परिषद, नगर विकास, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व राज्य परिवहन विभागातील प्रत्येक एका आरोपी लोकसेवकाचा समावेशही आहे. (प्रतिनिधी)
सर्वाधिक १६ आरोपी पुणे परिक्षेत्रातील
न्यायाल्याने शिक्षा ठोठावल्यानंतरही सापळा प्रकरणाशी संबंधित २६ अधिकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यास शासनाला वेळ मिळालेला नाही. यात मुंबई परिक्षेत्रातील २, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक परिक्षेत्रातील प्रत्येकी १, नागपूरमधील ३, अमरावतीमधील २ व पुणे परिक्षेत्रातील १६ आरोपींचा समावेश आहे.