व्हॉट्सअॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र
By Admin | Updated: January 8, 2017 00:04 IST2017-01-08T00:04:55+5:302017-01-08T00:04:55+5:30
व्हॉट्सअॅप व फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्रे टाकून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

व्हॉट्सअॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र
तणाव, : दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल, नागपुरी गेट, बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील घटना
अमरावती : व्हॉट्सअॅप व फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्रे टाकून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. नागपुरी गेट व बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गंभीर प्रकार शुक्रवारी सायंकाळनंतर उघडकीस आला असून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
पोलीस सूत्रानुसार, बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नमूर नगरातील रहिवासी मोहम्मद इम्रान अब्दूल सईद (३७) यांनी त्यांच्या मोबाईलवर फेसबुक उघडून पाहिले असता त्यामध्ये धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र 'अपलोड' केल्याचे निदर्शनास आले. ही बाब त्यांच्या समाजातील नागरिकांना माहिती होताच त्यांनी बडनेरा ठाण्यावर धाव घेऊन संबंधित इसमाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दुसरी घटना नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. हैदरपुऱ्यातील रहिवासी अब्दुल रफीक अब्दुल रज्जाक (३२) हे त्यांच्या भाच्याच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप समूह पाहत असताना त्यांना त्यावर आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी नागपुरी गेट पोलीस ठाणे गाठून संबंधित अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंदविली. या दोन्ही घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम २९५(अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.