चूक काय गुडेवारांची ?
By Admin | Updated: May 13, 2016 00:04 IST2016-05-13T00:04:27+5:302016-05-13T00:04:27+5:30
अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीवार्ताने अवघे शहर ढवळून निघाले आहे.

चूक काय गुडेवारांची ?
लोकमत प्रासंगिक
अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीवार्ताने अवघे शहर ढवळून निघाले आहे. केवळ राजकीय प्रतिष्ठेपोटी करण्यात आलेली ही बदली सामान्य नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे. शहरभरातून आता एकच सवाल विचारला जात आहे- चूक काय गुडेवारांची?
चंद्रकांत गुडेवार हे अमरावती महापालिकेचे आयुक्त म्हणून अवघ्या वर्षभरापूर्वी रूजू झालेत. कधी नव्हे तो आश्चर्यकारक बदल अमरावतीकर अनुभवू लागले आहेत. अमरावती शहरात होणारी रस्ते, नाल्या, पेव्हींग ब्लॉकची कामे अचानक कशी दर्जेदार होत आहेत. शहर स्वच्छतेत झालेला बदल नोंद घेण्याजोगा आहे. सामान्यांचा घामाचा पैसा सदुपयोगी लागतो आहे. महापालिकेतील दलाली संपुष्टात आली आहे. नागरिकांना थेट आयुक्तांचे दालन खुले आहे.
कंत्राटदारी भ्रष्टाचाराशिवाय होऊच शकत नाही, असाच सर्वत्र समज आहे. अमरावती महापालिका त्याच चाकोरीतून प्रवास करीत आली आहे. परंतु आता कंत्राटदार सांगतात ते अविश्वसनीयच आहे. एक उदाहरण नोंदविण्याजोगे आहे. राजू मुंदडा आणि महेंद्रसिंग बैस हे जिल्हा परिषदेत कंत्राट स्वीकारणारे कंत्राटदार. ते म्हणाले, आम्ही महापालिकेत कंत्राटासाठीची नोंदणी केली. नोंदणी केली की, संबंधित टेबलवर पन्नास हजार रुपये ठेवावेच लागतात. सर्वत्र हा नियम सारखा आहे. आम्ही कंत्राटदारांनीही तो स्वीकारलेला आहे. नोंदणी झाली म्हणून संबंधित कर्मचाऱ्याच्या पुढ्यात आम्ही चाळीस हजार रुपये ठेवले. तो ताडकन म्हणाला, पैसे नकोच; पण पैशांची गोष्टही नको. अविश्वसनीय आहे; पण खरे आहे. आजपर्यंत आम्ही त्या कार्यालयात चहा प्यायलो त्याचेदेखील पैसे आम्हाला द्यावे लागले नाहीत. एखादा प्रमुख अधिकारी निकोप आणि प्रामाणिक असल्याची अनेक उदाहरणे आहेत; परंतु त्याच्या अधिनिस्त असलेले कर्मचारीही त्याच्या धाकाने भ्रष्टाचार करीत नाहीत, असे चित्र असलेले अमरावती महापालिका हे देशातील एकमेव उदाहरण ठरावे.
महापालिकेत रोज काही तास घालविणाऱ्या एका प्रख्यात बिल्डरचाही अनुभव असाच- ते म्हणतात, नियमबाह््य कामे करायची. मोठ्या रकमा भरण्याला फाटा द्यायचा. अधिकारी-लोकप्रतिनिधींच्या संगनमताने मंजुरी मिळवायची, ही महापालिकेची आजवरची रीत. माझ्यासारख्या गुणवत्तापूर्ण व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकालाही त्यात नाईलाजाने सामील व्हावे लागत असे. गुडेवार आलेत नि आम्हा बिल्डरांचे लक्षावधी रुपये वाचलेत. कुणाला पैसेच द्यावे लागत नाहीत हो! केवढा हा आमूलाग्र बदल! हे केवळ गुडेवारच घडवून आणू शकतात. राजकीय स्वार्थासाठी अशा अधिकाऱ्यांचा बळी जात असेल तर अमरावतीचे ते दुर्भाग्यच!
भ्रष्टाचार गुडेवारांना असा थरथर कापत असताना अमरावतीच्या काही राजकीय नेतृत्त्वांना गुडेवार का नको, हा सवाल अंतर्मुख करणारा आहे. सामान्यांची वकिली करणारा, सामान्यांसाठी लढणारा, सामान्य म्हणूनच जगणारा हा अधिकारी नाव-अडनावाने कुणीही असो- तो आहे सामान्यांचे प्रतिरूप! तो आहे लोकशाहीचे स्वच्छ स्वरूप! गुडेवारांच्या बदलीवार्तेनंतर सामान्यांच्या मनात उमटलेली वेदनेची लकेर त्याचीच पावती होती. गुडेवारांच्या बदली स्थगितीसाठी सामान्यजनांतून ऐनवेळी होऊ लागलेला उठाव त्यांच्या चकाकणाऱ्या प्रामाणिकतेचे प्रमाण होते.
अमरावती ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आहे. नावात देवेंद्र असलेल्या फडणवीसांनी गुडेवारांसारखा कर्मठ अधिकारी त्यांच्या मामाच्या गावी धाडला; पण दुर्दैव- या इंद्रपुरीची शान जपण्यासाठी देवेंद्र अपयशी ठरले. त्यांना मान तुकवावी लागली, स्वार्थी राजकारणापुढे! आघाडी शासनापेक्षा युती शासन वेगळे आहे हे दाखविण्याची नामी संधी मुख्यमंत्र्यांनी गमावली. त्यांच्या राजकीय कौशल्यगुणांची हार म्हणा की, स्थानिक नेतृत्त्वांपुढे नमते घ्यावे लागण्याची अपरिहार्यता; मुख्यमंत्र्यांनीही केला तो अन्यायच! प्रामाणिकतेला हुसकावून लावण्याचा, भ्रष्टाचाराला राजाश्रय देण्याचा!