'कुत्ता खाने की पुलिस कम्प्लेंट की थी क्या?'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:29 IST2017-08-11T23:29:01+5:302017-08-11T23:29:31+5:30
'कुत्ता खाने की पुलिस कम्प्लेंट की थी क्या?' असे प्रश्न वसतिगृहातील परप्रांतीय विद्यार्थी मुद्दामच श्रीनाथवाडीवासीयांना विचारत आहेत.

'कुत्ता खाने की पुलिस कम्प्लेंट की थी क्या?'
अमरावती : 'कुत्ता खाने की पुलिस कम्प्लेंट की थी क्या?' असे प्रश्न वसतिगृहातील परप्रांतीय विद्यार्थी मुद्दामच श्रीनाथवाडीवासीयांना विचारत आहेत. तक्रारीनंतरही करवाई न केल्याने त्या विद्यार्थ्यांची हिम्मत वाढल्याचेच हे द्योतक आहे.
श्रीनाथवाडीतील श्वानचोरी, श्वानहत्या आणि श्वानभक्षणाचा गंभीर मुद्दा राजापेठ पोलिसांसाठी क्षुल्लक ठरला आहे. या प्रकरणाचा तपास ज्या संथगतीने सुरू आहे, त्यावरून श्रीनाथवाडीतील नागरिकांना आता पोलीस प्रशासनाच्या प्रामाणिकतेवरच संशय निर्माण झाला आहे.
कारवाई न झाल्याने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांचे मनसुबे बळकट झाले आहेत. अनेक वर्षांपासून सातत्याने त्रास होऊनही श्रीनाथवाडीतील रहिवासी उघडपणे पोलीस तक्रार करीत नव्हते. यावेळी ती केली; परंतु तक्रारीला पोलीस प्रशासनाकडून आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडून गांभीर्यपूर्वक प्रतिसाद मिळाला नाही. नियम, शिस्त, कायदा, लोकाधिकार हे केवळ शोभेचेच शब्द असल्याच्या प्रतिक्रिया त्यामुळेच त्रस्त रहिवासी आता व्यक्त करीत आहेत.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी या प्रकरणाची जातीने दखल घेऊन श्वानहत्येचे आरोपी शोधून काढावे, वगळण्यात आलेल्या श्वानचोरीच्या कलमांतर्गतही गुन्हे दाखल करावे, अशी मागणी प्राणीप्रेमी संघटनांची आणि जागृक नागरिकांची आहे.
प्रभाकररावांच्या घोषणेचे काय?
श्वानचौर्य, श्वानहत्या आणि श्वानभक्षण करणाºया आमच्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांना निलंबित करू, असे अश्वासन प्रभाकरराव वैद्य यांनी दिले होते. आठवडा उलटला मात्र प्रभाकररावांनी अमरावतीकरांना दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरविले नाही. वेळ मारून नेण्यासाठी तर असे आश्वासन देण्यात आले नव्हते ना, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.