महापालिकेच्या कामांची यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:19+5:302021-03-17T04:14:19+5:30
(लोगो) अमरावती : महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांसाठीचा निधी पळविता. कामेही बदलविता. या छोट्या मानसिकतेमधून राज्य कसे चालविणार, असा थेट ...

महापालिकेच्या कामांची यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग कशी?
(लोगो)
अमरावती : महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांसाठीचा निधी पळविता. कामेही बदलविता. या छोट्या मानसिकतेमधून राज्य कसे चालविणार, असा थेट सवाल सभागृहनेता तुषार भारतीय यांनी मंगळवारच्या आमसभेत केला. कार्यान्वयन यंत्रणा असणाऱ्या महापालिकेच्या कामांची यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग कशी, अशी विचारणा त्यांनी सभागृहात केली.
महापालिकेची मार्च महिन्यातील आमसभा व्हीसीद्वारे मंगळवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आयुक्तांकडून हे प्रशासकीय प्रकरण अवलोकनार्थ ठेवण्यात आले होते. यावर बोलताना गटनेत्यांनी शासनधोरणावर प्रहार केला. एक विशिष्ट भागात कामे का, असा आरोप त्यांनी केला. महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत ४.२४ कोटींच्या निधीला व तीन नवीन कामांना मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सत्तापक्षात असलेली खदखद बाहेर आली.
शहरातील गटार लाईनमधील चेंबरमधून पाणी वाहत आहे व यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्यावरून सदस्य नीता राऊत कमालीच्या संतप्त झाल्या. या योजनेंतर्गत शहराच्या बहुतेक भागातील चेंबर ‘ओव्हर फ्लो’ झाल्याचा आरोप त्यांनी केला. मजीप्रामार्फत सुरू असलेल्या या योजनेचे काम आता तिसऱ्या टप्प्यात आहे. अनेक अडचणी असल्यानेही चेंबरचे पाणी रस्त्यावर येत आहे. याबाबत आता झोननिहाय यंत्रणा निर्माण करण्याचे आश्वासन आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले.
आमसभेतील चर्चेत विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, विलास इंगोले, नीलिमा काळे, प्रशांत डवरे, प्रकाश बनसोड, मिलिंद चिमोटे, अजय सारसकर आदींनी सहभाग नोंदविला.
बॉक्स
अग्निशमनच्या कंत्राटींना आता ‘पूर्ण काम, पूर्ण वेतन’
दोन दिवसांपूर्वी ७० फूट विहिरीत कोसळलेला चार वर्षाचा बालक व त्याला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेणाऱ्या वडिलाचे रेस्क्यू करणाऱ्या अग्निशमन चमूच्या अभिनंदनाचा ठराव विलास इंगोले व अजय गोंडाणे यांनी मांडला. जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या या विभागातील नियमित कर्मचाऱ्यांना इन्क्रिमेंट व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ण काम-पूर्ण वेतन देण्याची मागणी त्यांनी केली. यावर पुढच्या महिन्यापासून देण्यात येणार असल्याची ग्वाही सभापतींनी सभागृहाला दिली.
बॉक्स
रेस्क्यू व्हॅनसह शौचालय घोटाळ्याचा अहवाल येत्या आमसभेत
मंगळवारच्या आमसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सलीम बेग युसूफबेग यांनी मल्टियुटिलिटी रेस्क्यू व्हॅन व वैयक्तिक शौचालय घोटाळ्याच्या चौकशीचा आणि त्या अनुषंगाने करावयाच्या कारवाईचा अहवाल सभागृहासमोर का ठेवला नाही, अशी विचारणा केली. यासंदर्भात सभागृहाचा ठराव झाला आहे, असे ते म्हणाले. हे दोन्ही अहवाल पुढील आमसभेत ठेवण्यात येणार असल्याचे सभापती चेतन गावंडे यांनी सांगितले.
बॉक्स
थकीत करासंबंधी अभय योजनेला मुदतवाढ
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी २५ जानेवारी ते १५ मार्च कालावधीकरिता अभय योजना लागू करण्यात आली होती. या योजनेची मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्याची मागणी गटनेता तुषार भारतीय यांनी केली. याद्वारे थकीत मालमत्ता कर व २० टक्के दंडाची दिल्यास थकबाकीदारांना ८० टक्के प्रमाणात दंडात्मक रकमेवर सूट मिळणार आहे. ही मुदत आता २५ मार्चपर्यंत करण्याची ग्वाही सभापती चेतन गावंडे यांनी दिली.