दंड वसुली लाखोंच्या घरात, नियमांचे काय?
By Admin | Updated: December 12, 2015 00:14 IST2015-12-12T00:14:54+5:302015-12-12T00:14:54+5:30
शहरातील अनियंत्रित वाहतूक नियमनाची जबाबदारी असलेल्या शहर वाहतूक शाखेने ११ महिन्यांत तब्बल ८५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दंड वसुली लाखोंच्या घरात, नियमांचे काय?
वाहतुकीचा खोळंबा कायमच : वाढते अतिक्रमण, अल्पवयीन वाहनधारकांमुळे समस्या
अमरावती : शहरातील अनियंत्रित वाहतूक नियमनाची जबाबदारी असलेल्या शहर वाहतूक शाखेने ११ महिन्यांत तब्बल ८५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ६८ हजारांपेक्षा अधिक वाहनचालकांच्या खिशातून ही रक्कम शासनाच्या खात्यात ‘वळती’ करण्यात आली. वाहतूक शाखा दरवर्षी दंडाचे ‘इमले’ बांधत असताना वाहतुकीच्या नियमनाचे काय, असा प्रश्न मात्र कायमच आहे.
बेशिस्त, मुजोर, अशा शेलक्या विशेषणांची नेहमी हिणवल्या जाणाऱ्या आॅटोचालकांविरोधात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जोरदार कारवाई केली. मात्र त्या तुलनेत शहरातील अनियंत्रित वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांनी अंकुश लावणे शक्य झाले नाही. आजही राजकमल असो की जयस्तंभ, चित्रा असो सरोज अशा झाडून साऱ्या चौकात वाहतुकीचा उडालेला बोजवारा नित्याची गोष्ट आहे. नो-पार्किंगमधून कितीही गाड्या उचलून आणल्यातरी रोजचा कारवाईचा आकडा वाढतच आहे.
शहरात रस्त्यावर थाटलेले अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी सुद्धा वाहतूक शाखेवर आहे. मात्र गेल्याकाही दिवसांपासून दुकानासमोर असलेले अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. शहरातील अनेक आॅटो रॉकेल मिश्रित इंधनावर चालक असताना वाहतूक शाखेने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतात. (प्रतिनिधी)