पाण्याअभावी संत्राबागा जगवाव्यात कशा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:17 IST2018-03-09T23:17:34+5:302018-03-09T23:17:34+5:30
यावर्षी मोर्शी तालुक्यातील तळणी ते गोराळा शिवारापर्यंत अत्यल्प पाऊस झाला असल्याने शेतातील विहीरी आताच कोरड्या झाल्या आहेत.

पाण्याअभावी संत्राबागा जगवाव्यात कशा ?
आॅनलाईन लोकमत
नेरपिंगळाई : यावर्षी मोर्शी तालुक्यातील तळणी ते गोराळा शिवारापर्यंत अत्यल्प पाऊस झाला असल्याने शेतातील विहीरी आताच कोरड्या झाल्या आहेत. यामुळे संत्रा बागा कशा जगवायच्या, या विवंचनेत संत्रा बागायतदार शेतकरी आहेत.
यावर्षीसुद्धा पावसाची नोंद मोर्शी येथे तालुक्याच्या ठिकाणी घेतली गेली. परंतु, तेथून दोन किलोमीटर अंतरावरच तळणी ते गोराळा शिवारापर्यंतच्या अंदाजे २० ते २५ किलोमीटर परिसरात अत्यल्प पाऊस पडला. पर्यायाने शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे डिसेंबरअखेर तसेच जानेवारीच्या सुरुवातीलाच विहिरी कोरड्या पडू लागल्यात. अजून उन्हाळा यायचाच, तर रब्बीची पिके कशी काढावी आणि मुख्यत्वे संत्रा बागा कशा जगवाव्यात, या विवंचनेत येथील शेतकरी आहे.
यावर्षी २००३ पेक्षाही भीषण दुष्काळ परिस्थिती असल्याने तसेच परिसरातील बराचसा भाग ड्राय झोनमध्ये असल्याने बोअरवेल (कुपविहीर) करता येत नाही. तेव्हा संत्रा बागायतदार शेतकरी संत्रा बागा कशा जगविणार, या विवंचनेत आहेत.
तेव्हा मिळाले होते सिंचनासाठी पाणी, अनुदान
२००३ मध्ये तत्कालीन शासनाने अप्पर वर्धा धरणातून नांदगावपेठ औद्योगिक क्षेत्रात आलेल्या पाइप लाइनमधून शेतकºयांना संत्राबागांकरिता पाणी देण्यात आले होते. याकरिता सावरखेड येथे पाणी वापर संस्थेची निर्मिती करून त्या माध्यमातून संत्रा बागा जगविण्याकरिता शेतकºयांना पाणी देण्यात आले होते. पाण्याअभावी वाळलेल्या संत्रा झाडांकरिता १२५ रुपये प्रतिझाड याप्रमाणे ८० झाडांसाठी एकूण ९०४३ शेतकºयांना ६ कोटी ८५ लाख ६१ हजार ८७५ रुपये अनुदान सरकारतर्फे देण्यात आले होते.
संत्रा बागा जगविण्याकरिता सरकारने सन २००३ प्रमाणेच अप्पर वर्धा धरणातून नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीला नेलेल्या पाइप लाईनवरून पाणीपुरवठा करून शेतकºयांना दिलासा द्यावा. वाटल्यास त्या पाण्याचे योग्य भाडे घ्यावे.
- धनंजय तट्टे, संचालक, मोर्शी कृषिउत्पन्न बाजार समिती