आमच्यासाठी केले काय?
By Admin | Updated: October 9, 2016 01:00 IST2016-10-09T01:00:09+5:302016-10-09T01:00:09+5:30
पदवीधरांनी आमदारपदी निवडून दिल्यानंतर आणि पुढे मंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर रणजित पाटील यांनी ...

आमच्यासाठी केले काय?
परीक्षा पाटलांची : पदवीधरांचा सर्वत्र एकच सवाल
अमरावती : पदवीधरांनी आमदारपदी निवडून दिल्यानंतर आणि पुढे मंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर रणजित पाटील यांनी पदवीधरांकडे तसेच सामान्यांकडे केलेले दुर्लक्ष ही त्यांच्यासमोरील प्रमुख अडचण ठरू लागल्याचे चित्र आजघडीला सर्वत्र आहे.
सामान्यांमध्ये दांडग्या जनसंपर्काचा अभाव असलेले गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना पदवीधर मतदारसंघातून मिळालेला आमदारकीचा विजय ही खरे तर राजकीय भरारी घेण्याची सुवर्ण संधी होती. उच्चविद्याविभूषित असलेल्या पाटलांना या नामी संधीचा कौशल्यपूर्ण पद्धतीने वापर करता येणे सहज शक्य होते. तथापि वैद्यकीय व्यवसायात गुणवंत असलेले पाटील येथे कमी पडले.
मुख्यमंत्र्यांसोबत जवळचे संबंध असल्यामुळे रणजित पाटील यांना कालांतराने गृह खात्याच्या शहरी विभागाचे राज्यमंत्रिपद आणि अकोल्याचे पालकमंत्रिपद मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या सर्वाधिक जवळचे मंत्रिमंडळातील सहकारी, असा पाटील यांचा लौकिक झाला. मानही वाढला; परंतु या सन्मानासोबतच त्यांच्या शिरावरची जबाबदारी कैकपटीने वाढली. स्वप्रगतीचा आनंद खुद्द पाटलांना जितका होता तितकाच तो सामान्यजनांनाही होता. त्याला कारणही होते. पाटलांना बहाल झालेल्या अधिकारांमध्येही वाढ झाली होती. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, लोकांच्या भल्यासाठीचे मुद्दे शासनदबारी रेटण्यासाठी, बेराजगारांचे जीणे सुसह््य करण्यासाठी या अधिकारांचा वापर केला जाईल, या कल्पनेने त्याच्या अवतीभतवतीचे लोक हुरळले होते. त्यांच्या मतदारसंघातही याच कारणामुळे आनंदी-आनंद होता.
सामान्यजनांना त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणींवर उपाय हवे होते. बेरोजगारांना नोकऱ्या अन् पदवीधरांना आयुष्याचा निर्णायक ठावठिकाणा हवा होता; पण जुनाच अनुभव आला.
लाभाच्या राजकारणात व्यग्र
अमरावती : हुरळलेल्या लोकांना काहीच प्राप्त झाले नाही. आपले मंत्री मुख्यमंत्र्यांकडे जाऊन समस्यांसाठी भांडतील, ही आशा मृगजळ ठरली. मुख्यमंत्र्यांचा जो लाभ पाटील यांना झाला तो सामान्यजनांपर्यंत, पदवीधरांपर्यंत पझरलाच नाही.
रणजित पाटील हे लाभाच्या राजकीय डावात इतके गुंतले की, सामान्यांच्या अपेक्षांची ना त्यांनी कदर केली ना चिंता. सत्ता काहीही घडवून आणू शकते, या समिकरणावर जणू आंधळा विश्वास ठेवणाऱ्या पाटील यांनी सामान्यांच्या पदरी जी निराशा टाकली, त्यासंबंधिच्या चर्चांचे आता मोहोळ उठू लागले आहेत. आपल्या मतांवर रणजित पाटील मोठ्ठे झाले खरे; पण आपल्यासाठी त्यांनी काय केले, पदविधरांचा हा जागोजागी विचारला जाणारा सवाल बरेच काही सांगून जातो.
सत्तेचा दुरुपयोग
सत्तेची नशा कशी असते बघा! बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि सत्तेचा दुरुपयोग पाटील यांनी निवडणुकीवर डोळा ठेवून वर्षभरापासून सुरू केला. युवक बेरोजगारांचे मेळावे, पदवीधर मतदारसंघाची सदस्य नोंदणी, पदवीधरांना प्रलोभने, शाळांमध्ये कार्यक्रम या बाबींसाठी पाटील यांनी सर्रास शासकीय यंत्रणेचा वापर केला. विरोधी पक्षांनी त्याबाबत आकांततांडव केलाच; परंतु समान्यांच्या मनातही पाटील यांच्या या वृत्तीची चीड निर्माण झाली. बी.टी.देशमुखांसारख्या द्रष्ट्या, अभ्यासू नेत्याच्या मतदारसंघातील मतदार तसा खुळा नाहीच. राजकारणासाठी सत्तेचा दुरुपयोग त्यामुळेच खपवून घेतला जाणारा मुद्दा नाही. दुसरीकडे स्पष्टवक्तेपणाच्या स्वभावात आमुलाग्र बदल घडवून संजय खोडके यांनी सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिला. दांडगा जनसंपर्क, सामान्यांची कामे करण्यासाठीची अव्याहत धडपड, पदवीधरांच्या समस्यानिवारणात सक्रिय सहभाग या सत्ता नसतानाही आवर्जून जपलेल्या बाबी लोकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरला. 'बी.टी.' उभे राहणार असतील तर आजही मी माघार घेणार, हे खोडके यांचे जाहीर विधान त्यांच्या राजकीय परिपक्वतेची उंची वाढविणारे ठरले. पाटलांचा राजकीय नवखेपणे आणि खोडकेंचा राजकीय मुरब्बीपणा हादेखील निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पाटलांना बरेच होमवर्क करावे लागणार आहे.