‘डीन’ करतात तरी काय ?
By Admin | Updated: January 23, 2017 00:05 IST2017-01-23T00:05:49+5:302017-01-23T00:05:49+5:30
विद्यापीठात शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाची पुरती वाट लागली आहे. बीपीएड महाविद्यालये शेवटच्या घटका मोजत आहेत ...

‘डीन’ करतात तरी काय ?
चार विद्यार्थी उपस्थित : विद्यापीठात ‘एमपीएड’ प्रवेशात सावळागोंधळ
गणेश वासनिक अमरावती
विद्यापीठात शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाची पुरती वाट लागली आहे. बीपीएड महाविद्यालये शेवटच्या घटका मोजत आहेत तर एमपीएड अभ्यासक्रमात नऊ विद्यार्थ्यांचाच प्रवेश असून केवळ चार विद्यार्थी उपस्थित राहत असल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे विद्यापीठाचे विद्याशाखा अधिष्ठाता (डीन) करतात तरी काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
विद्यापीठाचे विद्याशाखा अधिष्ठाता एम.एच.लकडे यवतमाळहून कारभार पाहतात. ‘कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन’मध्ये ते कार्यरत आहेत. मात्र, विद्यापीठात ‘एमपीएड’ अभ्यासक्रमाची ३० प्रवेशक्षमता असताना यंदा केवळ नऊ विद्यार्थ्यांचाा प्रवेश झाला आहे. त्यातही दोन विद्यार्थी शासकीय नोकरीवर असून नियमित अभ्यासक्रमाला न येण्याच्या अटीवर त्यांनी ‘एमपीएड’ला प्रवेश घेतला आहे. नऊ पैकी चारच विद्यार्थी प्रात्यक्षिक, थेअरीला उपस्थित राहतात. शारीरिक शिक्षणाचे अभ्यासक्रम माघारण्याशी अधिष्ठात्यांना काहीही घेणे-देणे नाही. अभ्यासक्रमाला प्रवेश नसला तरी यवतमाळ-अमरावती अशा प्रवासभत्त्याची अधिष्ठात्यांनी नियमित उचल केली आहे, हे विशेष. विद्यापीठात एमपीएड अभ्यासक्रम कसा चालतो, हे अधिष्ठात्यांनी कधीच बघितले नाही. एमपीएड विभागप्रमुखवजा प्राध्यापक म्हणून तनुजा राऊत या एकट्याच या विभागाचा डोलारा सांभाळत आहेत. अभ्यासक्रमात विद्यार्थी येत नसले तरीही त्यांची नियमित उपस्थिती दर्शविण्याचा प्रताप सुरु आहे. नियमानुसार ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय परीक्षा देता येत नाही. मात्र, प्राध्यापक त्यांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांची मोडतोड करीत आहेत. विद्यार्थी उपस्थित नसताना अनुदान मिळविणे, स्कॉलरशिप घेणे, असे प्रकार सुरू आहेत, या गंभीर प्रकारावर चिंतन होणे गरजेचे आहे. शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना ‘फार्महाऊस’चे रूप आले असताना याबाबत गांभीर्याने निर्णय घेण्याचे धाडस कोणीही दाखविले नाही. यापूर्वी शिक्षण विद्याशाखा अधिष्ठातांनी नियमबाह्य प्रवासभत्ता, देयकांची उचल केल्याप्रकरणी राज्यपालांच्या आदेशानुसार चौकशी देखील सुरू असल्याची माहिती आहे. (क्रमश:)
नोकरी व अभ्यासक्रमात प्रवेश घेता येत नाही. मात्र संबंधित विभागाने तसे पत्र दिले असेल तर प्रवेश घेता येतो. मात्र, अनेक महाविद्यालयांत प्राध्यापकच नसतात. यावर्षी सीईटीमुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत. शारीरिक शिक्षण महाविद्यालयांची दयनिय अवस्था झाली आहे.
- एम.एच.लकडे, अधिष्ठाता