‘ट्रॉमा केअर’ची निर्मिती कशासाठी ?

By Admin | Updated: June 9, 2015 00:31 IST2015-06-09T00:31:51+5:302015-06-09T00:31:51+5:30

अमरावतीची हळूहळू ‘मेट्रोसिटी’कडे वाटचाल सुरू आहे. स्थित्यंतराच्या लाटेतून अमरावतीचाच अविभाज्य घटक ...

What is the creation of 'Trauma Care'? | ‘ट्रॉमा केअर’ची निर्मिती कशासाठी ?

‘ट्रॉमा केअर’ची निर्मिती कशासाठी ?

लाखोंचा खर्च करून उपयोग काय? : अपघातग्रस्तांचे उपचाराअभावी जातात प्राण, इर्विनच पर्याय
बडनेरा : अमरावतीची हळूहळू ‘मेट्रोसिटी’कडे वाटचाल सुरू आहे. स्थित्यंतराच्या लाटेतून अमरावतीचाच अविभाज्य घटक असलेला बडनेरा परिसरही सुटलेला नाही. येथील स्थान वैशिष्ट्यांमुळे बडनेरा सध्या प्रगतीच्या वाटेवर आहे. मात्र, विकासचक्रात अडकलेली खीळ काढून टाकल्याशिवाय बडनेराचा संपूर्ण विकास होणे नाही. स्वतंत्र औद्योगिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व लाभलेल्या बडनेऱ्याच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रगल्भ राजकीय इच्छाशक्तीची आणि प्रामाणिक पाठपुराव्याची गरज आहे. काही दिवसांपासून येथे ‘ट्रॉमाकेअर युनिट’च्या निर्मितीचा मुद्दा ऐरणीवर आहे. हॉस्पिटलची अद्ययावत इमारत दोन वर्षांपासून तयार असली तरी पदभरती आणि काही महत्त्वपूर्ण यंत्रसामग्रीचा अभाव इतक्या क्षुल्लक कारणांसाठी रूग्णालयाचे लोकार्पण रखडले आहे.
बडनेरा येथे रेल्वे जंक्शन आहे. रेल्वेस्थानकावरून देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेगाड्या जातात. साहजीकच बडनेऱ्याकडे येणाऱ्या प्रवाशांची वर्दळ चोवीस तास सुरू असते. यवतमाळ मार्गावरूनही जड वाहनांसह इतर वाहनधारकांची वाहतूक सतत सुरू असते. वाहनांची संख्या आणि वाहतुकीची गती लक्षात घेता बडनेरा महामार्गावर अपघातांची संख्याही प्रचंड मोठी आहे. अपघातातील जखमींना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात आणता-आणताच कित्येकांची प्राणज्योत मालवते.
अपघात कोणत्याही कारणाने होवोत, प्राणहानी मात्र अनेकदा उपचारातील विलंबामुळे होते, हे वास्तव आहे. त्यामुळे येथे ‘ट्रॉमाकेअर हॉस्पिटल साकारल्यास अपघातग्रस्त रूग्णांना वेळेवर उपचार मिळतील आणि त्यांचे प्राण वाचविणे शक्य होईल. मात्र, शासन- प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ट्रामाकेअरचे काम काही मार्गी लागत नाही.
सन २०११ मध्ये या ‘ट्रॉमाकेअर युनिटचे भूमिपूजनही करण्यात आले. दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ट्रामाकेअर युनिटची इमारत उभी केली. मात्र, दोन वर्षांपासून ही इमारत उभीच्या उभीच आहे.
२४ आॅगस्ट २०१४ रोजी तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते या ट्रामा केअर युनिटचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आरोग्य प्रशासनाकडून या ‘ट्रॉमाकेअर युनिटसाठी २८ लाखांची यंत्रसामुग्रीदेखील आली. २० बेड, आॅपरेशन कीट, व्हेंटिलेशन, आॅक्सिजन बंब व इतर साहित्याचा त्यात समावेश आहे. मात्र, आरोग्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला आणि या ‘ट्रॉमाकेअरचे उद्घाटन रखडले ते रखडलेच. कर्मचाऱ्यांची पदभरती व थोडक्या यंत्रसामुग्रीअभावी हा दवाखाना रूग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेला नाही. बडनेरासह, नांदगाव खंडेश्वर तालुका, लोणी, भातकुलीसह आसपासच्या खेड्यातील अनेक अपघातग्रस्त रूग्ण जिल्हा कित्येकदा तर वेळेवर उपचार न मिळाल्याने रूग्ण दगावतात. बडनेरा हे मध्यभागी आहे.

देखभालीवर
लाखोंचा खर्च
ट्रामा केअर युनिट तयार झाल्यापासून याठिकाणी तीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली. त्यावर खर्च केला जात आहे. येथे विद्युत पुरवठा देण्यात आला आहे. त्यावरही खर्च होतोय. शिवाय या रूग्णालयात येऊन पडलेल्या साधन सामग्रीसाठी लाखोंचा खर्च होत आहे.

तत्कालीन आघाडी शासनाकडे पाठपुरावा करून ट्रॉमाकेअर युनिट उभे केले. पदभरती व यंत्र सामग्रीच्या अभावामुळे ते सुरू झाले नाही. यासाठी मी सातत्याने आरोग्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे.
- रवी राणा,
आमदार, बडनेरा .

बडनेऱ्याचे ट्रॉमाकेअर हॉस्पिटल सुरू करण्याचे प्रयत्न जोरकसपणे सुरू आहेत. या युनिटमध्ये पदभरती व संपूर्ण यंत्रसामग्री येताच हे हॉस्पिटल रूग्णसेवेत सुरू केले जाईल.
- अरूण राऊत,
जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती.

चालू वर्षात शासनाने बडनेरा येथील ट्रॉमाकेअर हॉस्पिटलसाठी दमडीही दिलेली नाही. पैशाअभावी हे हॉस्पिटल सुरू होणार नाही. परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी.
- सुरेंद्र टेंभुर्णे,
महानगर अध्यक्ष, पीरिपा.

वर्षभरात हजारांवर रूग्णांची अमरावतीला रवानगी
बडनेऱ्याला वळसा घालून एक्सप्रेस हायवे गेला आहे. यवतमाळ, अकोला मार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. शासनाच्या १०८ क्रमांकाच्या ५ रूग्णवाहिका या परिसरात तैनात आहेत. बडनेरा, लोणी, नांदगाव खंडेश्वर व मंगरूळ चव्हाळा याठिकाणी एक-एक गाडी देण्यात आली आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास गंभीर, अतिगंभीर रूग्णांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात न्यावे लागते. असे वर्षभरात १ हजारांच्यावर रूग्ण अमरावतीला हलविण्यात आले आहेत. हे करताना काहींची वाटेतच प्राणज्योत मालवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच बडनेरात ट्रॉमाकेअर युनिट सुरू झाल्यास ते वरदान ठरेल.

Web Title: What is the creation of 'Trauma Care'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.