आश्रमाच्या मौनामागे दडले काय ?
By Admin | Updated: August 29, 2016 23:56 IST2016-08-29T23:56:32+5:302016-08-29T23:56:32+5:30
पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमाच्या अख्त्यारित चालविण्यात येणाऱ्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांवर आश्रमाच्याच परिसरात नरबळीच्या हेतुने नियोजित हल्ला करण्यात आला.

आश्रमाच्या मौनामागे दडले काय ?
घ्या ना पत्रपरिषद : कळू द्या आश्रमाची भूमिका जनतेला
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमाच्या अख्त्यारित चालविण्यात येणाऱ्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांवर आश्रमाच्याच परिसरात नरबळीच्या हेतुने नियोजित हल्ला करण्यात आला. विश्वशांतीसाठी आयुष्य वेचणारे त्या आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष असलेले शंकर महाराज यांना कमालीचा आत्मक्लेष व्हावा, अशाच या घटना. तथापि या अत्यंत पिडादायी घटनांबाबत महिना लोटूनही आश्रमाच्यावतीने एकदाही पत्रपरिषद घेऊन भूमिका विशद करण्यात आली नाही. आश्रमाच्या या आश्चर्यकारक मौनामागे नेमके दडले तरी काय, असा प्रश्न आता सामान्य नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
आश्रम हा सामान्य लोकांसाठीची आध्यात्मिक जागा आहे. शंकर महाराज हे मूळचे गरीब. त्यांच्या लोककल्याणाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवून, त्यांच्या शक्तिंवर श्रद्धा ठेवून लोकांनी दिलेल्या डोळे दिपविणाऱ्या दानातूनच हा भव्य आश्रम उभा झाला. विस्तार वाढविताना महाराजांनी पाच शाळा आणि वसतिगृह आश्रमात सुुरू केले. त्यासाठी शासनाचे अनुदानही स्वीकारले. आश्रम ट्रस्टचे संस्थापक अध्यक्षपद त्यांनी स्वत:कडेच ठेवले. त्यामुळेच ते आश्रमाचे सर्वाधिकारी ठरतात. आश्रमाच्या अख्त्यारित चालविल्या जाणाऱ्या शाळा, वसतिगृहामध्ये अमरावती आणि लगतच्या जिल्ह्यांतील शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात आला. त्यांचे शिक्षण आश्रमाच्या हद्दीत आजही सुरू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून भारत देशाचे भवितव्य घडविण्याचा आश्रमाने जणू 'ज्ञानयज्ञ'च आरंभला, असा समज सामान्यजनांचा. त्याचदृष्टीने आश्रमाकडे बघण्याची सामान्यांची नि:संशय दृष्टी. श्रद्धेने आश्रमात जाणे, प्रार्थना करणे, पोटाला चिमटा घेऊन दानपेटीत दान टाकणे, महाराज असतील तर त्यांचे दर्शन घेणे, अपार श्रद्धेने त्यांच्या पाया पडणे, त्यांच्या हातून मिळालेला प्रसाद भक्तीभावाने ग्रहण करणे, त्यातील थोडासा स्वत: सेवन करणे नि बराचसा घरातील मंडळींसाठी नेणे- ही सामान्यांची त्या आश्रमाबाबतची श्रद्धा.परंतु शंकर महाराजांचे वास्तव्य असलेल्या आश्रमातील 'ज्ञानयज्ञा'त मायबापाने विश्वासाने पाठविलेल्या निष्पाप, निरागस काळजांच्या तुकड्यांचीच 'आहुती' देण्याचा प्रकार घडतो, ही बाब सामान्यांच्या लक्षात आली त्यावेळी अवघ्या जिल्ह्यात वैचारिक अभिसरण झाले. जिल्हा मुख्यालय, तालुका मुख्यालये, गावे पेटून उठलीत. आरोपींच्या अटकेची मागणी पोटतिडकीने मांडली गेली. मोर्चे, निवेदने यांचा रतिबच लागला. कधी नव्हे ते सातत्य या मुद्यासंबंधीच्या लोकसंतापात दिसू लागले. नरबळीच्या दोन घटना उघडकीस आल्यात. आरोपी आश्रमातीलच कर्मचारी निघाले. तथापि आश्रमात गुन्हा घडल्यानंतर लगेचच आणि ती संधी हुकल्यावर नरबळी प्रयत्नाचे आरोपी पकडल्यानंतरदेखील आश्रमाने पत्रपरिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली नाही. जे घडले ते सामान्यांच्या कल्पनेपलीकडील होते. श्रद्धेचा बळी देणारे होते. हृदयात धस्स झालेल्या लाखो मातांना, मनाचा दगड झालेल्या लाखो बापांना, डोळ्यात भय दाटलेल्या ताई-दादांना, भांभावलेल्या आजोबा-आजींना या मुद्यावर महाराजांचे विचार ऐकण्याची कमालीची उत्सुकता निर्माण झाली. तशी ती निर्माण होणे नैसर्गिकच.
सत्य कथनाला टाळाटाळ का ?
अमरावती : माझ्या जिल्ह्यातील एका धार्मिक आश्रमात हे अघटीत घडल्याचे कळल्यावर, मुले तेथे शिक्षणासाठी असोत वा नसोत, पण संवेदनशील, सजग नागरिक या नात्याने आश्रमात नेमके काय घडले, यावर आश्रमाचे स्पष्टीकरण काय, ज्या शंकर महाराजांच्या नावाने सारे वैभव उभारले गेले त्यांचे या मुद्यावर मत काय? हे जाणून घेणे सामान्यांच्या उत्सुकता शमविण्यापुरतेच मर्यादित नाही, तर त्यांचे कर्तव्यदेखील आहे. समाजाचे आपण सारेच घटक असल्यामुळे आणि समाजकल्याणासाठी आश्रम कार्यरत असल्यामुळे आश्रमाने, ट्रस्टींनी आणि शंकर महाराजांनीही सत्य विशद करण्याची भूमिका तत्काळ तसेच वेळोवेळी निभवायला हवी होती. त्यांनी ती स्वत:हून निभावली नाहीच; परंतु माध्यमांकडून संपर्क साधल्यावरदेखील प्रतिसाद देण्यात आला नाही. आश्रमाने चुप्पी तोडण्याचे आवाहन माध्यमांतून करण्यात आल्यावरही ना कर्मचारी, ना पदाधिकारी- कुणीही जनतेसमोर चर्चेस उपलब्ध झाले नाही. शंकर महाराजांनीही हा मुद्दा महत्त्वाचा जाणला नाही. उलटपक्षी प्रसिद्धी माध्यमांमध्ये भय निर्माण व्हावे, माध्यमांनी लेखणी 'म्यान' करावी यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आश्रमप्रेमींनी, महाराजांच्या भक्तांनी अविवेकी पद्धतीने राग व्यक्त केला. अविचारी जमावाने करावी अगदी तशीच नारेबाजी केली. वृत्तपत्रे जाळली. सूक्ष्म मानसिक हिंसा करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. वाहतुकीचे नियम तोडून, मालवाहू उपयोगासाठी असलेल्या ट्रकमधून ही मंडळी अमरावतीत पोहोचली होती. हे सारेच चित्र लोकभावना भडकवून गेले. आम्ही आमच्या आश्रमात काहीही करू. मुलांचे गळे कापू. चेहरे ठेचू. तुम्ही विचारणारे कोण? विचाराल तर याद राखा! असाच जणू संदेश आश्रमप्रेमींच्या कृत्यातून सार्वजनिक झाला. आश्रम लोककल्याणासाठी असेल आणि तेथे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांशी आश्रमाचा, ट्रस्टींचा, शंकर महाराजांचा दुरान्वयानेही संबंध नसेल तर माध्यमांशी, सामान्यजनांशी संवाद टाळण्याचे कारण काय? मौन कशासाठी, हा प्रश्न अखेर अनुत्तरित राहतो.
ुउचला पेन, व्हा लिहिते
शोधपत्रकारिता आणि निडर पाठपुरावा करुन ‘लोकमत’ने प्रथमेश आणि अजय यांच्यावरील नरबळीच्या हल्ल्याला वाचा फोडली. प्रथमेशचा लढा आता लोकलढा झाला. याविषयीच्या लोकभावनांचा पत्रांच्या माध्यमातून पाऊस पडतो आहे. तुम्ही गप्प का? उचला पेन नि व्हा लिहिते. पत्ता आहे -
‘लोकमत भवन’, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, शिवाजीनगर, अमरावती - ४४४६०३