प्रथमेशच्या बोलण्याची शक्यता किती ?
By Admin | Updated: August 28, 2016 23:55 IST2016-08-28T23:55:47+5:302016-08-28T23:55:47+5:30
अघोरी विद्येची उपासना करणाऱ्यांनी डाव साधला होता; पण निरागस प्रथमेश बचावला.

प्रथमेशच्या बोलण्याची शक्यता किती ?
‘तोडणे सोपे, जोडणे अवघड’ : श्वसनलिका, अन्ननलिका, स्वरयंत्र, थायरॉईड ग्रंथी अस्तव्यस्त
अमरावती : अघोरी विद्येची उपासना करणाऱ्यांनी डाव साधला होता; पण निरागस प्रथमेश बचावला. मृत्यूशी त्याने जिकरीने सामना केला. तो मृत्यूंजय ठरला. त्याच्या जगण्याविषयीची साशंकता नाहीशी होत असतानाच, तो बोलेल काय? ही साशंकता मात्र बळावत आहे.
शंकर महाराज यांच्या पिंपळखुट्यातील आश्रमात वास्तव्याला असलेल्या प्रथमेशचा गळा नागपंचमीच्या सकाळी ब्लेडने निर्दयीपणे चिरण्यात आला. नाना कारणांसाठी ज्या रुग्णालयाबाबत अनेकांचा संताप उफाळून येतो, त्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमेशला गळा कापलेल्या स्थितीत दाखल केले गेले. प्रथमेशवर प्राथमिक उपचार इर्विनमध्येच करण्यात आलेत. कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ.श्रीराम महल्ले यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण वैद्यकीय इलाजामुळेच तो 'स्टेबल' झाला. प्रथमेशला इर्विनमध्ये आणले त्यावेळी त्याची श्वासनलिका आणि तिच्या खालीच चिकटून असलेली अन्ननलिका कापलेली होती. शरीरातील एकूण रक्तपुरवठ्यापैकी एक तृतियांश रक्तपुरवठा डोक्याला होत असतो. सर्व महत्त्वाचे अवयव कवटीत समावलेले असल्यामुळे हा 'हेवी ब्लड सप्लाय' निसर्गत: डोक्याच्या भागाकडे वळविलेला आहे. प्रथमेशला अतिरक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे तो 'शॉक'मध्ये गेला होता. गळ्यात, श्वासनलिकेभोवती थायरॉईड नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीला कुठल्याही ग्रंथीच्या तुलनेत सर्वाधिक रक्तपुरवठा होत असतो. या ग्रंथी वेगवेगळ्या लोबमध्ये विभागलेल्या असतात. या अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथीही कापल्या गेल्या होत्या. ग्रंथीला असलेले हाडाचे पातळ आवरण अर्थात् कार्टिलेजही कापलेले होते. अतिरक्तस्त्रावाचे हेदेखील एक महत्त्वाचे कारण होते. त्या ग्रंथीचे लोब (भाग) काळजीपूर्वक वेगळे करण्यात आलेत. त्यातून होत असलेला रक्तपुरवठा विविध रक्तस्त्रोतांचे मुख बांधून थांबविण्यात आला. तत्पूर्वी कापलेला 'विंड पाईप' अर्थात् श्वसननलिकेची 'कफ ट्रकियल ट्युब' टाकून डागडुजी करण्यात आली. श्वास नैसर्गिकरीत्या सुरू करण्यात आला. श्वासनलिकेलाच खालच्या दिशेने लॅरिन्क्स अर्थात् स्वरयंत्र असते. आपण बोलू शकतो ते या स्वरयंत्रामुळेच. या स्वरयंत्राचा आकार अॅपलसारखा असल्यामुळे त्याला 'अॅदाम्स अॅपल' असेही संबोधतात. हे ‘अॅदाम्स अॅपल’देखील नरबळीसाठी गळा चिरताना कापले गेले होते. प्रथमेशच्या फुफ्फुसात काही प्रमाणात रक्त शिरले होते. निमोनिया न होण्याची खबरदारी म्हणून अन्टिबायोटिक्स दिले गेलेत. शरीरात रक्त पुरविले गेले. सुमारे चार तास सतत प्राथमिक इलाज झाल्यावर प्रथमेश 'स्टेबल' झाला.
डॉक्टर सांगतात, आश्रमातील लोकांनी आग्रह केल्यामुळे प्रथमेशला नागपूरला हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर पुढील उपचार सुरू करण्यात आलेत. नागपूरमध्ये प्रथमेशवर शल्यक्रिया करण्यात आली. कापलेल्या थायरॉईड ग्रंथीमधील कार्टिलेज (बाह््यकर्ण जशा पदार्थाचा बनलेला असतो, तसा पदार्थ) रिपेअर केले गेले. प्रथमेशच्या गळ्यातील तो महत्त्वाचा अवयव त्यामुळे सुस्थितीत आणला गेला. तो नाजूक भाग असल्यामुळे 'फायब्रोसिस' अर्थात् जखम पूर्ण भरण्याची प्रतीक्षा डॉक्टरांना आहे. त्याच्या अन्नसेवनासाठी अन्ननलिकेला भोक पाडून नळीने त्याला पातळ अन्न दिले जाते. दोन दिवसांपूर्वी तोंडाद्वारे दूध देण्याचा प्रयत्न केला असता त्याला असह््य उचक्या लागल्यात नि तो बेशुद्ध झाला होता.
प्रथमेशची पहिल्या शल्यक्रियेची जखम पूर्णत: भरली की, त्याच्या स्वरयंत्रावर शल्यक्रिया करावी लागेल. त्याला वैद्यकीय भाषेत 'फोनोसर्जरी' म्हणतात. त्यासाठी 'स्टॅबोस्कोपी'चा आधार घ्यावा लागेल. या क्रियेच्या माध्यमातून त्याचे स्वरयंत्र ‘रिपेअर’ केले जाऊ शकेल. त्याच्या स्वरयंत्राशी संबंधित 'लेफरिक्टल लॅरेन्जियल नर्व्ह' अबाधित असेल तरच तो बोलण्याची दाट शक्यता आहे. तथापि, त्यानंतरदेखील त्याला सहजपणे शब्दोच्चारण करता येणार नाही. त्याला 'फोनेशन' म्हणजेच शब्दांचे अचूक उच्चारण येण्यासाठी 'स्पिच थेरपी' द्यावी लागेल. महत्प्रयासाने मग तो बोलू शकेलही. पण 'तोडणे सोपे, जोडणे अवघड' या उक्तीप्रमाणे, या तमाम क्रियेसाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लागू शकेल.