ओल्या दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: August 14, 2015 00:58 IST2015-08-14T00:58:33+5:302015-08-14T00:58:33+5:30
पावसाने ७ दिवस दडी मारली खरी; मात्र यानंतर ४ आॅगस्टला सुरू झालेला पाऊस थांबायचे नाव नाही. १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे.

ओल्या दुष्काळाचे सावट
१० दिवसांपासून सतत पाऊस : कपाशी, तुरीला बाधक
अमरावती : पावसाने ७ दिवस दडी मारली खरी; मात्र यानंतर ४ आॅगस्टला सुरू झालेला पाऊस थांबायचे नाव नाही. १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. नदी-नाले ओसंडून वाहत आहेत, शेती पिकामध्ये पाणी साचले आहे, सर्वच धरणांची स्थिती ‘ओव्हरफ्लो’ आहे. १५ आॅगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शेती पिकासह सर्वच घटकांना बाधक असल्याने जिल्हावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.
जिल्ह्यात ४ आॅगस्टपासून पावसाला सुरुवात झाली. यावेळी जिल्ह्यात १ जून ते ४ आॅगस्टपर्यंत केवळ ३०४.९ मि.मी. पावसाची नोंद होती. हा पाऊस जिल्ह्याच्या अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १४० मि.मी. कमी होता. सद्यस्थितीत ३१ आॅगस्टपर्यंत पावसाची अपेक्षित सरासरी ५१४.६ मि.मी. असताना ५५९ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील १० दिवसांत तब्बल २६० मि.मी. पाऊस जिल्ह्यात पडला आहे व यापैकी १४८.८ मि.मी. पाऊस ४ ते ५ आॅगस्ट या २४ तासांत पडला होता व जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. या अतीपावसाने नदी-नाल्याकाठची किमान ५ हजार हेक्टरमधील शेतीपिके खरडली आहे. शेतात तळे साचले आहेत. शेतातील जवरणी, निंदण-खुपणाची कामे खोळंबली आहेत. कपाशी व तूर पिकावर ‘आकस्मित मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने अगदी थोड्या पावसाने नदी-नाल्यांना पूर येत आहे. यामध्ये जीवितहानी व वित्तहानी होत आहे. अनेक गावांचा संपर्क तुटतो, वीजपुरवठा खंडित होतो, हे नव्याने संकट उद्भवत आहे. ग्रामीण भागातील रस्ते चिखलात बुजले आहेत, शहरातील रस्ते खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती उद्भवली आहे. प्रदीर्घ दडीनंतर हवाहवासा व दिलासा देणारा पाऊस आता शेती पिकाच्या मुळावर उठला असल्याने जिल्ह्यातील शेती पिकावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.
१५ आॅगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा
विदर्भात १३ ते १५ आॅगस्टपर्यंत ४८ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे नागपूर विमानतळ येथील हवामान खात्याने कळविले आहे. या अनुषंगाने सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांना दिला आहे. हा पाऊस १८ आॅगस्टपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.
कमी दाबाचे क्षेत्र होताहेत तयार
उत्तर, मध्य प्रदेश, बंगालचा उपसागर, उत्तर आंध्रप्रदेश आणि ओरीसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. सौराष्ट्र, कच्छ, दक्षिण छत्तीसगढ व लगतच्या विदर्भावर ३.१ कि. मी. उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.
१० दिवसांत १० व्यक्तींसह
१२ जनावरांचा मृत्यू
संततधार पावसामुळे जिल्ह्यात ४ आॅगस्टपासून १३ आॅगस्ट या १० दिवसात १० व्यक्ती व १२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ व्यक्ती वीज पडून तर ६ व्यक्ती पुरात वाहले आहे. गुरांमध्ये २ बैल, ४ म्हशी, २ गाई व ४ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
तीन हजार हेक्टरमधील
शेती पिकांचे नुकसान
या १० दिवसांत झालेल्या पावसामुळे नदी-नाला काठावरील किमान ३ हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान तिवसा तालुक्यात आहे. साडेतीन हजार घरांची पडझड झाली, तर २० घरे पूर्णत: जमीनदोस्त झालीत.