‘त्यांचे’हात विणताहेत रेशीमधागे

By Admin | Updated: August 5, 2016 00:21 IST2016-08-05T00:21:38+5:302016-08-05T00:21:38+5:30

रक्षाबंधन हा उत्सव भाऊ- बहीण यांच्या नात्याचे पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. या शुभदिनी बहीण भावाला प्रेमाने राखी बांधते.

'Were weaving silkwadha in them | ‘त्यांचे’हात विणताहेत रेशीमधागे

‘त्यांचे’हात विणताहेत रेशीमधागे


रोजगाराचे साधन : कारागृहातील महिला बंदी तयार करताहेत राख्या

अमरावती : रक्षाबंधन हा उत्सव भाऊ- बहीण यांच्या नात्याचे पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. या शुभदिनी बहीण भावाला प्रेमाने राखी बांधते. त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत असते. भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला यथाशक्तीनुसार भेटवस्तू देत असतो. मात्र हातून नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित शिक्षेच्या रुपात भोगणाऱ्या महिला कैद्यांनादेखील रक्षाबंधनाची आस लागली आहे. रक्षाबंधन या पवित्रदिनी रक्ताची नाती असलेल्या भावाला त्या राख्या बांधू शकत नसल्या तरी कारागृहात बंदिस्त असलेल्या भाऊराया कैद्यांसाठी तितक्याच आतुरतेने राख्या तयार करण्यात मग्न आहेत.

येथील मध्यवर्ती कारागृहात दरवर्षी रक्षाबंधनाचे औचित्य साधून सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, विविध संघटनांच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीदेखील कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने १८ आॅगस्ट रोजी कारागृहात रक्षाबंधनाचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. कारागृहात बंदिस्त असलेल्या पुरुष कैद्यांना महिला बंदी या राख्या बांधून त्यांच्याकडून रक्षणाची हमी घेणार आहे. तसेच काही सामाजिक संस्थांनी देखील रक्षाबंधन कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत पत्र पाठविले आहे. परंतु रक्षाबंधन या पवित्रदिनी लागणाऱ्या राख्या या बाजारपेठेतनू नव्हे तर महिला कैदी स्वत: तयार करीत आहे. राख्या तयार करण्यासाठी एकूण १५ ते २० महिला बंदींनी पुढाकार घेतला आहे. रेशमाचे बंध विणताना महिला बंदीनी आपल्या भावासोबत घालविलेले बालपण आठवण असल्याचे महिला बंदी सेलच्या अधिकारी ज्योती आठवले यांनी‘लोकमत’ला सांगितले.

रक्षाबंधन या उत्सवाला वेगळे महत्त्व आहे. रोजची दिनचर्या आटोपली की महिला बंदी त्या राख्या वेळेपूर्वी कशा पूर्ण होतील, याचे नियोजन करीत आहेत. भावाची आठवण आली की, महिला बंदीच्या डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहत नाही, असे ज्योती आठवले यांनी सांगितले. कारागृहात सूर्योदय ते सूर्यास्त अशी बंद्यांची दिनचर्या असली तरी काही सण, उत्सव आले की महिला बंदीचे मन गहिवरून जाते. कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव यांनी सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत महिला बंदीना राख्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून उपलब्ध करून दिले आहे. कारागृहात ४५ महिला बंदी असून बहुतांश महिला बंदी राख्या तयार करण्यात मग्न आहेत. महिला बंदीना राख्या तयार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम महिला सेलच्या निरीक्षक ज्योती आठवले यांच्यासह प्रतिभा खाडे, सुषमा धारणे, मंजूषा बादूल, कांबळे गुरुजी आदी प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)



१० हजार राख्या तयार करण्याचे उद्दिष्ट

कारागृहात पाषाण भिंतीच्या आत विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महिला बंदींनी यावर्षी रक्षाबंधनासाठी १० हजार राख्या तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार महिला बंदी या दिवस- रात्र एक करुन राख्या तयार करण्यासाठी जामाने भिडल्या असल्याचे चित्र आहे.



महिला बंदींना मिळेल रोजगार

महिला बंदींनी तयार केलेल्या राख्यांचे स्टॉलवर विक्री केली जाईल. राखी विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात त्यांना रोजगार मिळणार आहे. सुधारणा व पुनर्वसनअंतर्गत महिला बंदींना रोजगार देणे अपेक्षित असून त्या दिशेने कारागृह प्रशासनाने पावले उचलली आहेत. प्रजापिता ब्रम्हाकुमारी, होलीक्रॉस कान्हव्हेंट, जिल्हा विधी प्राधिकरण आदी संस्थांनी राख्या खरेदी करण्याचे ठरविले, अशी माहिती कारागृह अधीक्षक भाईदास ढोलेंनी दिली.

Web Title: 'Were weaving silkwadha in them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.