शोधायला गेले दारू; सापडले १२ लाख
By Admin | Updated: June 23, 2017 00:09 IST2017-06-23T00:09:56+5:302017-06-23T00:09:56+5:30
अवैधरीत्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजता एका घराची झडती घेतली.

शोधायला गेले दारू; सापडले १२ लाख
आरोपीस अटक : परतवाड्याच्या बुनकरपुऱ्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अवैधरीत्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजता एका घराची झडती घेतली. दारू तर मिळालीच सोबत एका कपाटात आल्या त्या तब्बल १२ लाख ३८ हजार रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या करकरीत नोटांचे बंडल.
दीपक गोपाळराव लोंदे (४०, रा. बुनकरपुरा, परतवाडा) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून गुरूवारी त्याला अचलपूर न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
दीपक गोपाळराव लोंदे हा अवैधरीत्या दारूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजता बुनकरपुरा येथे जाऊन घराची झडती घेतली. त्यामध्ये पाच बॉटल विदेशी दारू व गावठी दारू असा जवळपास दोन हजार दोनशे रुपयांचा अवैध माल आढळून आला. पोलिसांनी दारू जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
कपाट उघडताच, नोटांचे बंडल
पोलिसांनी अवैधरीत्या दारुसाठा कुठे लपवून ठेवला यासाठी घराची झडती घ्यायला सुरूवात केली. कपाटामध्ये काही लपवून ठेवले का यासाठी ते उघडायला लावले. मात्र कपाटात दारू नव्हती. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटांचे कोरे करकरीत बंडल आढळून आले. हे पाहून पोलीसही अवाक् झाले. त्यांनी दीपक लोंदे याला नोटांबद्दल विचारणा केली असता तो योग्य उत्तर देऊ शकला नाही. एकूण १२ लाख ३८ हजारांची माहिती आयकर विभागाला दिली आहे.
शहरातील बुनकरपुरा येथील दीपक लोंदे यांच्या घरी बुधवारी अवैध दारू विक्रीतून झडती घेतली असता दारूसह १२ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम आढळून आली. आयकर विभागाला त्याची माहिती देण्यात आली आहे.
- संजय सोळंके,
ठाणेदार, परतवाडा