‘वेल डन’ महिला सरपंच निघाल्या करवसुलीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:14 IST2021-03-01T04:14:54+5:302021-03-01T04:14:54+5:30

फोटो पी २८ बग्गी चांदूर रेल्वे : पदभार स्वीकारताच चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदा महिला सरपंच करवसुलीसाठी ...

‘Well done’ female sarpanch goes for tax collection | ‘वेल डन’ महिला सरपंच निघाल्या करवसुलीला

‘वेल डन’ महिला सरपंच निघाल्या करवसुलीला

फोटो पी २८ बग्गी

चांदूर रेल्वे : पदभार स्वीकारताच चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदा महिला सरपंच करवसुलीसाठी घरोघरी फिरत आहेत. ‘घर टॅक्स भरा, ग्राम समृद्ध करा’ हे अभियान येथे राबविण्यात आले आहे. याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

कोरोनाकाळात ग्रामपंचायत निवडणूक पार पडून आरक्षण जाहीर झाले व गावोगावी सरपंच नियुक्त करण्यात आले. चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी येथील नवनिर्वाचित सरपंच विजया प्रकाश चवाळे यांनी पदभार स्वीकारताच सचिव डी. आर. इसळ यांच्या सहकार्याने ‘घर टॅक्स भरा, ग्राम समृद्ध करा’ हे अभियान हाती घेतले आहे. ग्रामस्थांकडून थकीत सामान्य कर व पाणीपट्टी कर घरोघरी जाऊन संकल्पना समजावून सांगत कर वसूल करण्यात येत आहे. ग्रामपंचायत बग्गीच्या इतिहासात पहिल्यांदा सरपंच करवसुली करीत आहेत. गावकऱ्यांचे सहकार्यसुद्धा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सरपंच विजया चवाळे यांनी स्वत: पाहणी करून एक वर्षापासून बंद असलेला पाणीपुरवठा पूर्ववत केला तसेच अंगणवाडी केंद्रात नवीन वीज मीटर बसविण्यात आले. पदभार स्वीकारताच कामे सुरू करण्यात आली आहेत. उपसरपंच सोनाली दांडगे, सचिव डी.आर. ईसळ, ग्रामपंचायत कर्मचारी राजू घोडे, साजन कासार, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चवाळे, ग्रामपंचायत सदस्य मुकिंदा कासार, लक्ष्मणराव चौधरी, नंदाबाई इंगळे आदी परिश्रम घेत आहेत.

बॉक्स

३१ मार्च पर्यंत १०० टक्के वसुलीचा निर्धार

सरपंचपदी नियुक्त झाल्यानंतर येत्या पाच वर्षांमध्ये गावाचा चेहरामोहरा बदलविण्याचे ठरविले आहे. त्याच अनुषंगाने प्रथम मागील पाच दिवसांपासून कर वसुलीच्या मागे लागले आहे. यामध्ये सर्वांची साथ मिळत आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत गावात शंभर टक्के कर वसुली करण्याचा निर्धार आहे. ‘ग्रामविकासाची धरु कास आणि बग्गी गावचा करू विकास’ याप्रमाणे काम करेल व गावाचा विकास करेल, असे नवनिर्वाचित सरपंच विजया चवाळे यांनी म्हटले.

Web Title: ‘Well done’ female sarpanch goes for tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.