इंटरसिटी, जबलपूर एक्स्प्रेसचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 09:51 PM2018-02-26T21:51:47+5:302018-02-26T21:51:47+5:30

Welcome to Intercity, Jabalpur Express | इंटरसिटी, जबलपूर एक्स्प्रेसचे स्वागत

इंटरसिटी, जबलपूर एक्स्प्रेसचे स्वागत

Next
ठळक मुद्देढोल-ताशांचा निनाद : चांदूर रेल्वे शहराला आले यात्रेचे स्वरूप

आॅनलाईन लोकमत
चांदूर रेल्वे : अमरावती-अजनी इंटरसिटी एक्स्प्रेस व अमरावती जबलपूर एक्स्प्रेसने सोमवारी चांदूर रेल्वे स्थानकावर थांबा घेताच उपस्थित शेकडो शहरवासीयांनी जल्लोष केला. ढोल-ताशांच्या निनादाने संपूर्ण स्टेशन दुमदुमले. एकाच दिवशी दोन रेल्वे गाड्यांना थांबा मिळाल्याचा विक्रमच येथे झाला आहे.
सर्वप्रथम रेल रोको कृती समितीचे सदस्य शेकडो शहरवासीयांसह पहाटे ५ वाजता स्थानिक सिनेमा चौकातील चंद्रशेखर आझाद पुतळ्याजवळ एकत्र आले. पुतळ्याला व दिवंगत पांडुरंग ढोले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून रॅलीने ढोल-ताशांसह रेल्वे स्थानकाकडे कूच केली. स्थानकावर खा. रामदास तडस, माजी आमदार अरुण अडसड यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते ढोल-ताशांसह विश्रामगृहातून आधीच पोहोचले होते. मात्र, समिती सदस्य व असंख्य शहरवासीयांनी ढोल-ताशांसह रेल्वे स्थानकात प्रवेश करताच वेगळा माहोल तयार झाला. रेल रोको कृती समितीचा विजय असो, डॉ. पांडुरंग ढोले अमर रहे, एकजुटीचा विजय असो, लढेंगे-जितेंगे अशा घोषणांनी परिसर निनादला. यानंतर भाजपातर्फे घोषणा देण्यात आल्या. सकाळी ६.१५ वाजता इंटरसिटी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्र. १ थांबताच रेल रोको कृती समिती व भाजपतर्फे गाडीला हार घालण्यात आला. लोकोपायलट डी.ए. मानवटकर, सहायक व्ही.एच. पाटील व गार्ड व्ही.व्ही. वखरे यांचा यथोचित सत्कार शहरवासीयांनी केला. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता जबलपूर एक्स्प्रेसने प्लॅटफॉर्म क्र. २ वर थांबा घेतला. यावेळी गाडीला हारार्पण केले तसेच लोकोपायलट एम.एम. आर्य, सहायक व गार्ड एन. एम. जरोंडे यांचा थाटात सत्कार करण्यात आला. या गाडीच्या प्रस्थानाला रेल रोको कृती समितीच्यावतीने फुलांचा वर्षाव करण्यात आला. दोन्ही गाड्यांना रेल रोको कृती समितीतर्फे नितीन गवळी, महमूद हुसेन, तर भाजपातर्फे खा. रामदास तडस, दिनेश सूर्यवंशी यांनी हिरवी झेंडी दाखविली. विशेष म्हणजे, रेल्वे स्टेशन प्रबंधक डी.आर. मुदलीयार, उपप्रबंधक एस.एच. धुरंधर, देवेश बाजपेयी, गार्ड, तिकीट काऊंटरवरील कर्मचारी या सर्वांचा यथोचित सत्कार समितीच्यावतीने करण्यात आला तसेच खा. रामदास तडस यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर रेल्वे थांब्यासाठी अथक परिश्रम घेणाºया रेल रोको कृती समितीच्या सदस्यांनी इंटरसिटी एक्स्प्रेसचे तिकीट काढले. कार्यक्रमासाठी बडनेरा येथील जीआरपीएफचे पीएसआय नागरे, स्थानिक रेल्वे पोलीस व चांदूर रेल्वे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी रेल रोको कृती समितीचे रेल रोको कृती समितीचे राजाभाऊ भैसे, महमूद हुसैन, विनोद जोशी, शेख हसनभाई, क्रांतिसागर ढोले, विजय रोडगे, संजय डगवार, गौतम जवंजाळ, भीमराव खलाटे आदी उपस्थित होते.
रेल रोको कृती समितीचा असाही योग !
स्थानिक रेल्वे स्टेशनवर रेल रोके कृती समितीचे सदस्य, शहरवासी व भाजप नेते, कार्यकर्ते असे दोन गटांत आजूबाजूने उभे होते. त्यामुळे रेल्वे कुठे थांबणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु योगायोग असा की, दोन्ही एक्स्प्रेस रेल रोको कृती समितीच्या गटाजवळ थांबल्या. यावरून उपस्थितांकडून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.

Web Title: Welcome to Intercity, Jabalpur Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.