धनी बी गेलं अन् पोरगं बी!
By Admin | Updated: October 11, 2015 01:23 IST2015-10-11T01:23:43+5:302015-10-11T01:23:43+5:30
‘‘चार वर्षापूर्वी धनी गेलं अन् यंदा तरणंताठं पोरगं.... साऱ्या संसाराची दारुमुळं माती झाली.

धनी बी गेलं अन् पोरगं बी!
यवतमाळमधील महिलांचा आक्रोश : दारुने मोडला संसाराचा कणा
अमरावती : ‘‘चार वर्षापूर्वी धनी गेलं अन् यंदा तरणंताठं पोरगं.... साऱ्या संसाराची दारुमुळं माती झाली. मोलमजुरी करून घर कसंबसं चालत असताना आता लहान पोरगं बी दारुले लागलं. काय करावं कायबी समजत नाही, हमाली, मोलमजुरी करुन जगणं सुरू आहे.’’
घाटंजीच्या पंचफुला पेंदोर यांची ही करुण कहाणी. त्यांच्या संसाराचा कणा दारुच्या व्यसनामुळे मोडून पडला. यवतमाळ जिल्ह्याची ओळख सर्वाधिक आत्महत्येचा जिल्हा म्हणून असताना दारूच्या व्यसनाने शेकडो संसारही उद्धवस्त झालेत. पंचफुला पेंदोर, ललिता मुंगले, पार्वती करपती, अर्चना मोरे, पार्वता उईके, पल्लवी मंडवधरे ही फक्त प्रातिनिधीक उदाहरणे.
सावजींच्या प्रयासमध्ये संवाद
अमरावती : अविनाश सावजी यांच्या प्रयास-सेवांकूर भवनामध्ये या महिलांनी त्यांचे संसार कसे उद्ध्वस्त झालेत, ही आपबिती कथन केली. त्यांचे मोडलेले संसार, दारुमुळे होणारे समाजविघातक परिणाम या ६ महिलांनी प्रातिनिधिक स्वरुपात जनतेसमोर मांडले. आम्ही आता समाजासाठी जगतो, आमचे संसार तर भरकटले मात्र इतरांचे नकोत, अशी प्रामाणिक भावना त्यांनी मांडली. अविनाश सावजी यांनी त्यांना बोलके केले.
यवतमाळमध्ये काही वर्षांत शेतकरी आत्महत्येचा आकडा फुगत असताना दारुबळीने कहर केला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. घाटंजीच्या अर्चना मोरे या २७ वर्षीय विवाहितेची कथाही वेगळी नाही. दोन लहान मुली पदरात असताना अर्चना आज माहेरी राहून संसार हाकते आहे. दोन वर्षापूर्वी कुर्ली येथे भाड्याने राहत असताना तिचा पती प्रदीपने तिच्या व दोन वर्षांच्या मुलीच्या गळ्याभोवती फास आवळला होता. मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचल्यानंतर त्याने अर्चनाला बेदम मारले. नवरा डॉक्टर आहे अशी ती सांगते, मात्र कुठला पॅथीचा, हे तिला माहिती नाही. औषधाने भरलेले बॅग घेऊन गावोगाव फिरायचे आणि आलेला पैसा दारुत गमवायचा हा त्याचा दिनक्रम. तो प्रत्येक ठिकाणी नाव बदलून राहायचा, असा गौप्यस्फोट तिने केला. मात्र कारण तिला माहीत नाही.
सततची मारहाण सहन न झाल्याने अर्चनाने आज चिंचखेड हे माहेर गाठलं, नवरा कोठे आहे हे तिला माहित नाही.
सारी भिस्त तिच्यावर
पल्लवी मंडवधरे (१८) ही बीएसएसी प्रथम वर्षाला शिकतेय. आज कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर यऊन पडली आहे. ३० सप्टेंबरला तिचे वडील सुभाष मंडवधरे यांचा दारूने बळी गेला. रविवारी वडिलाची तेरवी असताना पल्लवीने आपल्या जीवनाची कशी कथा झाली आहे ही विदारक वस्तुस्थिती कथन केली. निरक्षर आई आणि लहान भावाची जबाबदारी तिच्यावर आहे. पांढरकवड्याच्या ललिता प्रभाकर मुंगले या महिनाभरापासून पतीपासून वेगळे राहत आहेत. १६ वर्षाचा मुलगा अन् १३ वर्षाची मुलगी घेऊन धुणीभांडी करून त्या संसार करताहेत. त्यांचा पती प्रभाकर गेल्या १७ वर्षांपासून दारू पितोय. मारहाण तर रोजचीच. ‘बाप रोज दारु पिऊन मायले मारते, हे रोजचं लेकरं पाह्यतं’ त्याईच्या मनावर काय परिणाम होईन, असा सवाल मलेच पडला व एवढ्या वर्षानंतर बाहेर पडली. ललिता मुंगले सांगत होत्या. कुणी नवऱ्याला सोडलं तर कुणाचा कुंकवाचा धनी दारुमुले गेला तर कुणी नवऱ्याचा त्रासापोटी जाळून घेतलं तर कुठे वडीलांची दारुने बळी गेल्यावर १८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर संसाराचा भार आलाय. दारुने झालेले परिणाम वेगवेगळे असतील. मात्र संसार उध्वस्त होण्यास कारण आहे ते म्हणजे दारू!
बायकोच्या व मुलीच्या मापाचे फाशाचे दोर तयार करून दारूकरिता पैशांची मागणी करणारा नवरा असलेली अर्चना मोरे, दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता दिले नाही म्हणून नवऱ्याने अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रयत्नातून वाचलेल्या पार्वती उईके, नवरा व दोन्ही मुलांची व्यसनाधीनता वाट्याला आलेल्या पार्वता करपते या व अशा सहा महिलांनी शनिवारी ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना’मध्ये हृदय हेलावून सोडणाऱ्या कहाण्या अमरावतीकरांशी शेअर केल्यात.
तरूणाई एकवटली
दारूमुळे संसाराची कशी धुळधाण होती, हे विदारक सत्य जनतेपर्यंत पोहोचवून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी यवतमाळमधील १७ हजार तरूण एकवटले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ५०७ दारु दुकाने बंद व्हावेत, यासाठी येथे स्वामिनी जिल्हा दारुबंदी अभियान राबविले जात आहे. या सहा महिलासुद्धा या अभियानाशी जुळल्या आहेत. यवतमाळमधील महेश पवार हा तरूण या अभियानाचे नेतृत्व करीत आहे. अभियानाला अधिक व्यापकता मिळावी, यासाठी व्यसनाधिनतेला बळी पडलेल्या महिलांसोबत पवार आज प्रयास सेवांकुरमध्ये पोहोचले. दारूबंदी ही जादूची कांडी नाही, मात्र सुरुवात झाली पाहिजे. दारुने सर्वसामान्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. शेकडो-हजारो जण दारुचे बळी ठरतात. म्हणूनच व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला असल्याचे महेश पवार यांनी सांगितले. यवतमाळ जिल्हा दारुमुक्त व्हावा यासाठी स्वामिनी जिल्हा दारूमुक्त अभियानाच्या माध्यमातून सुमारे १७००० तरुण हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहेत.