आम्ही पत्ता देतो, तुम्ही कारवाई करा
By Admin | Updated: July 22, 2016 00:29 IST2016-07-22T00:29:07+5:302016-07-22T00:29:07+5:30
चांदूरबाजारमध्ये एका ट्रकचालकाने अपघाताची मालिकाच घडविली. यामध्ये एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार, एक गंभीर जखमी झाले.

आम्ही पत्ता देतो, तुम्ही कारवाई करा
सर्वपक्षीय संघटना आक्रमक
अमरावती : चांदूरबाजारमध्ये एका ट्रकचालकाने अपघाताची मालिकाच घडविली. यामध्ये एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार, एक गंभीर जखमी झाले. त्या पार्श्वभूमिवर सामाजिक संघटना व सर्वपक्षीय राजकीय संघटना आक्रमक झाल्यात. घटनेतील दोषी असलेल्या सर्व यंत्रणेवर त्वरित कारवाई करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी रात्री ११ वाजतादरम्यान धडकले. यावेळी त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. जिल्ह्यात सर्वत्र गोहत्या सुरू असून आम्ही पता देतो, तुम्ही कारवाई करा, असा त्यांचा दम त्यांनी पोलिसांना दिला.भाजयुमो, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गौरक्षण समिती, पशुधन बचाव समिती, प्रहार संघटना व इतर सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात या घटनेचा तासभर रोष व्यक्त केला. गाडगेनगरच्या एसीपी चेतना तिडके यांनी आताच कोम्बिंग आॅपरेशन करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच पदाधिकारी शांत झाले.
असे झाले कोम्बिंग आॅपरेशन
सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा रोष पाहता गाडगेनगरच्या एसीपी चेतना तिडके यांनी रात्री उशिराच कोम्बिंग आॅपरेशन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पोलीस ताफ्यासह त्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनला पोहोचल्या. गाडगेनगरचे ठाणेदार अर्जुन ठोसरे व नागपुरी गेटचे ठाणेदार एस. एस.भगत यांच्या सोबतीने त्यांनी लालखडी परिसरात दोन ठिकाणी धाडी टाकल्या. परंतु जनावरांची कत्तल करणाऱ्यांना पोलीस पोहोचण्यापूर्वीच सुगावा लागल्याने ते सतर्क झाले. याठिकाणी पोलिसांना काहीही आढळून आले नाही. छुप्या मार्गाने कत्तल करणाऱ्यांची जागा खुफिया विभागाने त्यांना दाखविली. याठिकाणी जनावरांना बांधण्यासाठी वापरण्यात येणारे दोर मात्र तेथे आढळले. रात्री अडीच वाजेपर्यंत या परिसरात कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. राज्य राखीव दलाच्या पोलिसांसह दंगा नियंत्रण पथकाचा यामध्ये सहभाग होता.
आमची बहीण इस्पितळात
अपघातात जखमी झालेली एक मुलगी येथील गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल आहे. पदाधिकाऱ्यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अक्षीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. आमची बहीण जखमी असताना पोलीस शांत कसे, असा संतप्त सवालही पदाधिकाऱ्यांनी केला. या लोकांना पोलीस पाठीशी घालत असून घरात शिरून कारवाई करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असे रौद्ररुप पदाधिकाऱ्यांनी धारण केले होते. यावर शहरात या पदाधिकाऱ्यांकडून कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी कारवाईचे आश्वासन देऊन एसीपी चेतना तिडके यांनी पोलिसांचा ताफा घेऊन रात्रीच कारवाईला सुरुवात केली.
पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही
ग्रामीण भागातून छुप्या मार्गे अमरावती शहरात पहाटे रोज जनावरांनी ट्रक भरून येतात. यामध्ये गाईंचीही अमानुषपणे कत्तल केली जाते. हा प्रकार अमरावती पोलिसांना सर्वश्रृत आहे. पण आतापर्यंत पोलिसांनी एकही प्रभावी कोम्बिंग आॅपरेशन केले नाही. उलट गुन्हेगारांचे काही पोलिसांशी असेलेल्या हितसंबंधामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचे कुठलेही वचक दिसून येत नाही. आपण कायदेशीर कारवाई करावी व गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडावे, असे उपस्थितांनी एसीपी तिडके यांना सांगितले.
हप्तेखोर पोलिसांमुळेच घडली घटना
चांदूरबाजारमध्ये जो अपघात घडला तो ट्रक मोर्शीमार्गे चांदूरबाजारला आला होता. ट्रक येथे पोहोचेपर्यंत त्याला तीन पोलीस ठाण्यांची हद्द पार करावी लागली. परंतु नेहमीच जनावरांना टॅकमध्ये कोंबून अवैध वाहतूक केली जाते. पोलिसांना हे माहीत असूनही कारवाई केली जात नाही. थोड्याशी पैशासाठी पोलीस अशांना फितूर होतात. त्यामुळे या हप्तेखोर पोलिसांवर कारवाई करावी, असा संताप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सर्वपक्षीयांच्या मागण्या
जनावरे वाहून नेणाऱ्या वाहनांचे कायमस्वरुपी परवाने रद्द करा, दोषी पोलिसांवर त्वरित कारवाई करा, कोम्बिंग आॅपरेशन तातडीने राबवा, शहरातील कत्तलखाने बंद करा, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून पुन्हा असले कृत्य करण्यास तो धजावणार नाही, महाराष्ट्र पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांशी चर्चा करून तेथून जनावरांची वाहतूक नियंत्रित करा, जखमी मुलीला सुरक्षा द्या, पथके तयार करून जिल्हाभर कारवाई करा.
येथे होते गोवंश कत्तल
पठाण चौक, लालखडी, चपराशीपुरा, बिच्छू टेकडी आदी भागांत मध्यप्रदेश व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आणलेल्या जनावरे विशेषत: गोमाता यांची अमानुषपणे कत्तल केली जाते. पोलिसांच्या डोळ्यांदेखत मांसाचे ट्रक वेशीबाहेर विक्रीस जातात. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार फोफावला असून आम्ही स्वत: तुमच्यासोबत त्यांच्या पकडण्यासाठी येतो, अशा भावना हिंदूत्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.