रिपाइं-जनविकास फुटीच्या मार्गावर!
By Admin | Updated: January 7, 2015 22:43 IST2015-01-07T22:43:37+5:302015-01-07T22:43:37+5:30
महापालिकेत नऊ सदस्य संख्या असलेल्या रिपाइं, जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडी गटात फूट पडण्याची चिन्हे आहेत. तीन सदस्य कमालीचे नाराज असून ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

रिपाइं-जनविकास फुटीच्या मार्गावर!
‘स्थायी’वर नजर : तीन सदस्य बहिर्गमनाच्या तयारीत; विधानसभा निवडणुकीनंतर वेगवान हालचाली
अमरावती : महापालिकेत नऊ सदस्य संख्या असलेल्या रिपाइं, जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडी गटात फूट पडण्याची चिन्हे आहेत. तीन सदस्य कमालीचे नाराज असून ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
२०१२ मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आ. सुनील देशमुख यांनी जनविकास काँग्रेस तर माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी जनकल्याण आघाडीच्या नावे संघटना स्थापन करुन निवडणुकीत नशीब आजमाविले. या दोन्ही नेत्यांना महापालिका निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही. जनविकास काँग्रेस सहा तर जनकल्याण आघाडीचा एकच सदस्य निवडून आला. मात्र, महापालिकेत विविध समित्यांवर अधिराज्य मिळवायचे असल्यास गटस्थापनेसाठी नऊ सदस्य संख्या आवश्यक आहे. त्यामुळे जनकल्याण, जनविकासच्या सदस्यांनी रिपाइं (आठवले गट) चे दोन सदस्य सोबत घेऊन नऊ सदस्यांनी रिपाइं- जनविकास- जनकल्याण या नावाने महापालिकेत गट स्थापन केला. या गटाचे नेते प्रकाश बनसोड हे आहेत. गटाच्या सदस्य संख्येनुसार विषय समिती अथवा स्थायी समितीत सदस्यांची नियुक्ती करण्याचा शिरस्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनील देशमुख, जगदीश गुप्ता भाजपात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे महापालिकेत जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडीचे सदस्य वाऱ्यावर आहेत. नेत्यांनी पक्ष बदलविल्यानंतर होणाऱ्या दुर्लक्षामुळे हे सदस्य कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेत त्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे सुध्दा ते हैराण आहेत. या गटातील नऊ सदस्यांपैकी काहीच सदस्यांना महत्वाच्या जागी नियुक्ती मिळविता आली. त्यामुळे इतर सदस्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. महापालिका निवडणुकीत आ. सुनील देशमुख, जगदीश गुप्ता स्वतंत्र बॅनरखाली होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत चित्र पालटले. जनविकास, जनकल्याण आघाडीच्या सदस्यांना भाजपामध्ये जायचे नसल्याने काही सदस्य बाहेर पडण्याच्या मार्गाला असल्याचे चित्र आहे. एकेकाळचे सुनील देशमुखांचे खंदे समर्थक रतन डेंडुले यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांची साथ सोडली. विधानसभा निवडणुकीत सुनील देशमुखांविरुध्द प्रचारात रतन डेंडुले यांनी आघाडी देत रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.