मेळघाटमध्ये पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Published: May 9, 2014 12:57 AM2014-05-09T00:57:26+5:302014-05-09T00:57:26+5:30

जिल्हय़ातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची ओरड सुरु झाली असून मेळघाटमधील ८ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

Water supply through five tankers in Melghat | मेळघाटमध्ये पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा

मेळघाटमध्ये पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा

Next


अमरावती : जिल्हय़ातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची ओरड सुरु झाली असून मेळघाटमधील ८ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सुरुवातीच्या काळात केवळ एका गावालाच टँकरने पाणीपुरवठा केला जात होता; मात्र आता टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे.
चिखलदरा तालुक्यातील हत्तीघाट, खडीमल, तारुबांधा, ढोमणीफाटा, मोथाखेडा, पस्तलई, पाच डोंगरी व लवादा या आठ गावांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे ही गावे अतिदुर्गम भागातील असून तेथे पाण्याचे कुठलेही नैसर्गिक स्त्रोत नाहीत. त्यामुळे गावकर्‍यांना गावाबाहेरील विहिरी तसेच वाड्यांमधून पाणी आणावे लागत आहे. ऐन उन्हाळय़ात मेळघाटवासीयांची पाण्यासाठी भटकंती सुरू झालेली आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत पाणीटंचाई फारशी जाणवत नव्हती. मात्र मे महिना उजाडताच पाणीटंचाईने आपले भीषण स्वरुप धारण केले आहे. येत्या काही दिवसांत याच भागातील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. मेळघाट व्यतिरिक्त वरुड तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. मेळघाट वगळता अन्य तालुक्यांमध्ये वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सतर्क झाला असून अशा गावांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी त्या-त्या गावांमध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा केली जात आहे. मेळघाटातील ज्या आठ गावांना टँकरनी पाणीपुरवठा होत आहे त्याठिकाणी नैसर्गिक स्त्रोत नसले तरी पाणीटंचाई कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना दृष्टिक्षेपात आहे. यंदाचा पाणीपुरवठा आराखडा जवळपास ४.५ कोटी रुपयांचा असून सध्या आराखड्यातील तिसर्‍या टप्प्यातील कामे सुरु झाली आहे. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र काही गावांमध्ये नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे अशा गावांची पाणी टंचाई दूर करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर जिल्हा परिषदेच्यावतीने पाठपुरावा सुरू आहे. (प्रतिनिधी)
मेळघाटमध्ये ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा होत आहे त्या गावांमध्ये मुळातच नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाही. त्यामुळे तेथे स्त्रोत वाढविणे गरजेचे आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, हे जरी खरे असले तरी त्या ठिकाणी उपाययोजना करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.
-श्‍वेता बॅनर्जी
कार्यकारी अभियंता

Web Title: Water supply through five tankers in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.