संततधार पावसातही १६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By Admin | Updated: July 13, 2016 01:26 IST2016-07-13T01:26:32+5:302016-07-13T01:26:32+5:30

बुलडाण्याची परिस्थिती गंभीर; वाशिम व यवतमाळात प्रत्येकी दोन टँकर.

Water supply through 165 tankers in continuous rainfall | संततधार पावसातही १६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

संततधार पावसातही १६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

संतोष वानखडे/वाशिम
गत पाच दिवसांपासून अमरावती विभागात संततधार पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे ११ जुलैपर्यंत टंचाईग्रस्त गावांत १६५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. सर्वाधिक १२५ टँकर बुलडाणा जिल्ह्यात असून, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी दोन टँकर सुरू आहेत.
गत चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होते. २0१५ मध्ये अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने जलाशयामध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. परिणामी, २0१६ च्या उन्हाळ्यात अमरावती विभागातील अनेक गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. १३ जून २0१६ पर्यंत अमरावती विभागात तब्बल ३६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. जून महिन्यात विभागात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली होती. २७ जूनपर्यंतही समाधानकारक पाऊस नसल्याने तब्बल ३८१ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १0 टँकर, अकोला ४५ टँकर, वाशिम १00 टँकर, बुलडाणा १५२ टँकर व यवतमाळ जिल्ह्यातील ७४ टँकरचा समावेश आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ४ जुलैपर्यंत टँकरच्या संख्येत घट होऊन विभागातील पाच जिल्ह्यातील जलसाठा २१३ टँकरपर्यंत कमी झाला. यात विभागात सर्वाधिक १४७ टँकरद्वारे बुलडाण्यात पाणीपुरवठा होत असून,अकोला २६, अमरावती १0, वाशिम २७ व यवतमाळ जिल्ह्यातील १६ टँकरचा समावेश आहे.
गत पाच दिवसांपासून संपूर्ण विदर्भात संततधार पाऊस सुरू असल्याने टँकरच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट अपेक्षित असताना, ११ जुलैपर्यंत तब्बल १६५ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची नोंद राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. यामध्ये सर्वाधिक बुलडाणा जिल्ह्यातील १२५ टँकर असून, अमरावती जिल्ह्यात १0, अकोला २६ तर वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी दोन टँकरचा समावेश आहे. गतवर्षी ११ जुलैपर्यंत अमरावती विभागात केवळ ५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता, हे विशेष. यामध्ये अमरावती ८, अकोला व यवतमाळ प्रत्येकी २, वाशिम १९, बुलडाणा जिल्ह्यातील २६ टँकरचा समावेश होता.

Web Title: Water supply through 165 tankers in continuous rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.