दररोज एका झोनमधील पाणीपुरवठा बंद

By Admin | Updated: April 1, 2017 00:25 IST2017-04-01T00:25:31+5:302017-04-01T00:25:31+5:30

कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दररोज शहरातील एका झोनमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने केले आहे.

Water supply in one zone is closed every day | दररोज एका झोनमधील पाणीपुरवठा बंद

दररोज एका झोनमधील पाणीपुरवठा बंद

जीवन प्राधिकरणाचे नियोजन : वाढीव, सुरळीत पाणीपुरवठ्याचा उद्देश
अमरावती : कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दररोज शहरातील एका झोनमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने केले आहे. दर मंगळवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याऐवजी टप्प्या टप्प्याने एकेका झोनमधील पाणीपुरवठा दररोज बंद करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
उन्हाळ्यात नागरिकांच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता प्राधीकरणने पाणीपुरवठा वाढविला आहे. दररोज शहरवासियांना ९५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळ्यातील पाण्याची मागणी लक्षात घेता आता १२० दलली पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील महिन्यात तर ती स्थिती १३५ दललीवर जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यातच शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची ओरड नागरिकांची आहे. या पाणीपुरवठ्यात सुधारणा व्हावी, याकरिता प्रत्येक झोनमधील पाणीपुरवठा आठवड्यातील एक दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. २९ मार्चपासून शहरात टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अन्य टाक्यांवरून होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आठवड्यातील सहा दिवस सर्वच परिसरातील नागरिकांचा पाणीपुरवठा सुरु राहणार असून एकाच दिवसाकरिता पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन मजीप्राने केले आहे. याचा लाभ सुध्दा नागरिकांना मिळत असल्याचे निदर्शनास आले.

या टाक्यांवरील
पाणीपुरवठा राहणार बंद
रविवार - मायानगर व अर्जुननगर
सोमवार - बडनेरा जुनी वस्ती, नवी वस्ती, वडरपुरा, कॅम्प परिसर
मंगळवार - मालटेकडी (लोअर) व नागपूरी गेट
बुधवार - मालटेकडी (अप्पर झोन) व लालखडी
गुरुवार - भीमटेकडी प्रभाग, वडाळी व मंगलधाम कॉलनी
शुक्रवार -सातुर्णा, साईनगर व राठीनगर
शनिवार - व्हीएमव्ही परिसर व पॅराडाईज कॉलनी.

मोटारपंप लावून पाणी खेचणारे रडारवर
शहरात अनेक ठिकाणी जीवन प्राधीकरणाच्या पाईनलाईनला मोटारपंप लाऊन पाणी खेचले जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडे सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता हा प्रकार थांबविण्यासाठी मजीप्रा अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ज्यांच्याकडे मोटारपंपद्वारे पाणी खेचल्याचे निदर्शनास येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. आवश्यकता पडल्यास पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.

उन्हाळ्यातील वाढीव पाण्याची मागणी पूर्ण करणे व काही भागातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस प्रत्येक झोनमधील पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. या नियोजनामुळे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.
- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, मजीप्रा.

Web Title: Water supply in one zone is closed every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.