लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा ७ ते ९ फेब्रुवारी असे तीन दिवस बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या १५०० मिमी व्यासाच्या पी.एस.सी (सिमेंट) गुरुत्व वाहिनीवर चिंचखेड नजीक मोठ्या स्वरूपात गळती होत असल्याचे स्पष्ट केले आहे. या वाहिनीच्या दुरुस्तीेसाठी किमान तीन दिवस लागतील, असा प्राथमिक अंदाज मजीप्राने व्यक्त केला आहे. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रात्रंदिवस दुरुस्तीचे काम करण्याचे प्रस्तावित आहे.उन्हाळ्यापूर्वी वाहिनीची गळती दुरुस्त करण्यात आली नाही, तर मोठी समस्या उद्भवण्याचे चित्र आहे. त्यामुळे मजीप्राचे जलव्यवस्थापन उपविभाग क्रमांक ३ च्या उपविभागीय अभियंत्यांनी तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वीसुद्धा हिवाळा आणि पावसाळ्यात जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता, हे विशेष. आता तब्बल तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने अमरावतीकर नागरिकांना उन्हाळ्याच्या तोंडावर पहिल्यांदा पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.पाणी गळतीमागे कोण?सिंभोरा धरणातून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गुरुत्व वाहिनीवर सातत्याने गळती होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असताना जलवाहिनीवर गळती होते की ती फोडली जाते, हे शोधून काढणे जीवन प्राधिकरणापुढे आव्हान आहे. गळतीतून मोठे नुकसान होते. तरीही कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. उन्हाळा सुरू झाला की, जलवाहिनी फोडण्याची घटना होते. याप्रकरणी कारवाई का नाही, हासुद्धा चिंतनाचा विषय आहे.धरणातील पाणीसाठा चिंतेचा विषयअमरावती व बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंभोरा धरणात पाणीसाठा कमी असल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सिंभोरा धरणात २५ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत. आता दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या दिवसांतील अंतरात वाढ झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे बोलले जात आहे.
अमरावती, बडनेरा शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:12 IST
अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा ७ ते ९ फेब्रुवारी असे तीन दिवस बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
अमरावती, बडनेरा शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद
ठळक मुद्देचिंचखेड येथे मोठा बिघाड : ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ठणठणाट