‘ब्रीज कम बंधारा’तून आता पाणी साठवण
By Admin | Updated: October 26, 2014 22:32 IST2014-10-26T22:32:40+5:302014-10-26T22:32:40+5:30
गाव, खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पुलांवर बंधारे बांधून पाणी साठवण केली जाणार आहे. त्याकरीता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत ‘ब्रीज कम बंधारा’ साकारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची

‘ब्रीज कम बंधारा’तून आता पाणी साठवण
अमरावती : गाव, खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पुलांवर बंधारे बांधून पाणी साठवण केली जाणार आहे. त्याकरीता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत ‘ब्रीज कम बंधारा’ साकारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी येथे रविवारी दिली. हा अभिनव उपक्रम भविष्यात शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
नितीन गडकरी हे येथे कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी शासकीय विश्राम भवनात काही भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी निवेदिता चौधरी, जगदीश नाना बोंडे, प्रदीप शिंगोरे, विजय मोहता यांनी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राज्यात हवे होते, असे म्हणताच गडकरी यांनी ‘मी दिल्लेत सेट झालो आहे. देशाचे नेतृत्व करण्याची पक्षाने संधी दिली. त्यामुळे आपण दिल्लीतच खुष आहोत’, असेही ते म्हणाले.
गडकरी यांनी केंद्र शासनाने राबविलेल्या लोकाभिमुख योजनांचा पाढा वाचला. विदर्भात उद्योगधंदे नसल्यामुळे विदर्भ आर्थिकदृष्ट्या माघारल्याचे त्यांनी मान्य केले. नव्या योजनांची मुहूर्तमेढ रोवताना रामसेतू निर्माण कार्य हाती घेतले जाणार आहे. राज्यात सिंचन क्षमतेत विदर्भ फारच मागे असल्यामुळे पाणी साठवण करण्यासाठी ‘ब्रीज कम बंधारा’ हा उपक्रम सुरु होत आहे. या अभिनव उपक्रमामुळे लहान-मोठ्या शेतकऱ्यांना बंधाऱ्यातून शेतीसाठी पाणी वापर करता येईल. भविष्यात ही योजना विदर्भातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल, असे गडकरी म्हणाले.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत गाव-खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पूलाचे बांधकाम करुन त्याच भागात बंधारा निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता बंधाऱ्यात साठविले जाईल. गुरा, ढोरांना उन्हाळ्यात पिण्यास पाणी उपलब्ध होईल. मात्र, या बंधाऱ्यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा वापर करणे सोयीचे होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
देशभरातील ग्रामीण भागात ‘ब्रीज कम बंधारा’ या अभिनव उपक्रमातून पाणी साठवण करण्यावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून गाव, खेड्यातील रस्त्यांची निर्मिती करण्याचा उद्देश असला तरी छोट्या पुलाचे पक्के बांधकाम करणे, त्याच पुलांवर बंधारा निर्माण करणे जेणे करुन पाणी साठवण करण्याचा मार्ग सुकर होईल, असे गडकरी यांनी सांगितले. विदर्भाच्या विकासावर भरभरुन बोलत असताना गडकरींनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले, हे विशेष. इतर अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.