वाई गावात पाणीटंचाई
By Admin | Updated: December 15, 2015 00:13 IST2015-12-15T00:13:46+5:302015-12-15T00:13:46+5:30
तालुक्यातील मध्य प्रदेश -महाराष्ट्र सीमेवरील आदिवासीबहुल गाव वाई (खुर्द) येथील ग्रामपंचायतीच्या मालकीचे बोअर अचानक कोरडे झाल्याने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाई गावात पाणीटंचाई
२५ दिवसांपासून ठणठणाट : विहिरी अधिग्रहणात दिरंगाई
वरुड : तालुक्यातील मध्य प्रदेश -महाराष्ट्र सीमेवरील आदिवासीबहुल गाव वाई (खुर्द) येथील ग्रामपंचायतीच्या मालकीचे बोअर अचानक कोरडे झाल्याने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील २५ दिवसांपासून पाण्याकरिता ग्रामस्थांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना विहिरी अधिग्रहणाचा ठराव देऊनही प्रशासन दिरंगाई करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष खदखदत असल्याने पाण्याकरिता असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील आदिवासीबहुल वाई (खुर्द) गाव आहे. येथे सात सदस्यीय गटग्रामपंचायत आहे. या गावाची लोकसंख्या एक हजार २०० च्या जवळ आहे. या गावात एक शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा आणि श्री दादाजी धुनिवाले हाशस्कूल असून शेतमजुरांची संख्या अधिक आहे. सातपुड्याच्या कुशीत वरूडपासून २० किमी अंतरावर आहे. वाई (खुर्द ) येथे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बोअरवरून सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत सुरु होता. परंतु अचानक २५ दिवसांपूर्वी बोअर कोरडे झाले. परंतु भवानी डोह येथून एक दिवस पाणीपुरवठा केल्यानंतर तेही बंद पडले. एवढेच नव्हे तर हातपंपसुध्दा बंद पडले आहे. यामुळे ग्रामस्थांना होणारा पुरवठा बंद पडला आहे.
पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांना वणवण भटकंती करून एक ते तीन किलोमीटर अंतरावरुन लांब अंतराने जंगलातून पाणी आणावे लागते. वन्यप्राण्यांपासूनसुध्दा धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असताना सर्व कामधंदे बाजूला ठेवून पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामध्ये रोजगारसुध्दा बुडत आहे. ग्रामपंचायतीच्या सरंपचा यमुना इवनाते आणि उपसरपंच विष्णू ढबाले यांनी काही सदस्यांसह मासिक सभेत २४ नोव्हेंबर रोजी ठराव क्र. ८ घेऊन प्रशासनाने विहिरी अधिग्रहीत करून पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी, अशी मागणी केली.
सदर ठरावाच्या प्रतितहसीलदार आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना देण्यात येऊन तातडीने विहिरी अधिग्रहीत करण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेता गटविकास अधिकारी यांनी आधी थकीत असलेली वसुली करा, अन्यथा पाणीपुरवठा बंदच ठेवा, असे सांगून सरपंच, उपसरपंचाने वेळ मारून नेली. तहसीलदार यांनी प्रस्ताव आल्यांनतर पाहू म्हणून सांगितले. परंतु वाई (खुर्द) च्या पाणीटंचाईकडे कुणीही अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे.