तलई गावात १५ दिवसांपासून पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:50+5:302021-06-01T04:10:50+5:30

महिला पायदळ तहसीलवर धडकल्या फोटो पी ३१ धारणी धारणी : मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या दिया ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ...

Water shortage in Talai village for 15 days | तलई गावात १५ दिवसांपासून पाणीटंचाई

तलई गावात १५ दिवसांपासून पाणीटंचाई

महिला पायदळ तहसीलवर धडकल्या

फोटो पी ३१ धारणी

धारणी : मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या दिया ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तलई गावात १५ दिवसांपूर्वी बोअरवेलची मोटर जळाल्यापासून गावात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना दिल्यावरही त्यांनी दुर्लक्ष केल्याने महिला सोमवारी तहसील कार्यालयावर धडकल्या.

धारणी तालुक्यातील दिया ग्रामपंचायत अंतर्गत तलई गावातील पाणीपुरवठा पंधरवड्यापासून बंद पडला. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही पाणीप्रश्न मार्गी लावला नाही. परंतु, नागरिकांनी गावातीलच मदन येळणे यांच्या शेतातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. तेथून नागरिकांचे पाणी भरणे सुरू असताना, शेजारचे शेतकरी दशरथ प्रजापती यांच्या शेतात पाणी वाहत जात होते. यामुळे त्यांच्या पत्नीकडून पाणी भरणाऱ्या महिलांना दररोज शिवीगाळ झेलावी लागत आहे. दुसरीकडे ग्रामसचिव अनेक दिवसांपासून गावात आलेले नाहीत. याबाबत संताप व्यक्त करीत २० ते २५ महिला सोमवारी पायीच तहसील कार्यालयावर धडकल्या. उपविभागीय अधिकारी मिताली सेठी, तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याकडे त्यांनी पाणी टंचाईतून तात्काळ मुक्तता देण्याची मागणी केली.

गिरीजा धाडसे, लक्ष्मी जावरकर, सखुबाई प्रजापती, बबिता प्रकाश अंकेल, ललिता मालवीय, बबिता कासदेकर, सविता सावलकर, सुंदरलाल सावलकर, कमला जावरकर, रुक्मिणी सावलकर, रुक्मिणी जावरकर, सुकरती जावरकर, माधुरी येळणे, नंदिनी धाडसे, कमला धाडसे या महिला तहसील कार्यालयावर धडकल्या.

बॉक्स

बोअरवेलचा खड्डा बुजविण्यासाठी रॉयल्टीची प्रतीक्षा

तलाई गावाला पाणीपुरवठा करणारी बोअरवेल ही नाल्याच्या काठावर आहे. बाजूला दहा फुटांचा खड्डा पडला आहे. नादुरुस्त मोटर काढण्याकरिता आधी तो दहा फुटांचा खड्डा बुजवावा लागेल. त्यासाठी दहा ते पंधरा ट्रिप दगड लागतील. यानंतर तेथे मॅकेनिकची मोटर काढण्याकरिता घोडी तेथे लागणार आहे. ग्रामसचिवाने तहसीलकडे रॉयल्टीची मागणी केल्याचे समजते. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल.

Web Title: Water shortage in Talai village for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.