१५० गावांत पाणीटंचाई

By Admin | Updated: June 5, 2017 00:01 IST2017-06-05T00:01:33+5:302017-06-05T00:01:33+5:30

जिल्ह्यातील मेळघाटसह अन्य १५० गावांमध्ये अद्यापही तीव्र पाणीटंचाई आहे. यासाठी विविध कारणे असली तरी ती दूर करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ..

Water shortage in 150 villages | १५० गावांत पाणीटंचाई

१५० गावांत पाणीटंचाई

नागरिकांना मनस्ताप, भूजलस्तर घटला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील मेळघाटसह अन्य १५० गावांमध्ये अद्यापही तीव्र पाणीटंचाई आहे. यासाठी विविध कारणे असली तरी ती दूर करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही कोसभर अंतरावरून ग्रामीण जनतेला पाणी भरावे लागत असल्याचे वास्तव आहे. मेळघाटातील अनेक गावांमध्ये आजही पाण्यासाठी आबालवृद्धांची सुरू असलेली वणवण पाहिली की, प्रशासन पाणीटंचाईबाबत नेमक्या कोणत्या उपाययोजना करीत आहे, असा प्रश्न पडतो.
पाणीटंचाईबाबत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील १५० गावांमध्ये पाणीटंचाई असल्याची बाब नाकारली असली तरी अद्यापही अनेक गावांमध्ये पाणीसमस्या कायम असल्याच्या बाबीला मात्र दुजोरा दिला आहे. मेळघाटसह जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये कृत्रीम तर काही ठिकाणी कायमस्वरूपी पाणीटंचाई भेडसावत असते. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या प्रशासकीय सूत्रांनीच जिल्ह्यातील १५० गावांमध्ये पाणीटंचाई असल्याची बाब एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान कबुल केली होती.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्यावतीने उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ कोटयवधीचा कृतीआराखडा तयार केला जातो.

भारनियमनामुळे पाणीटंचाई तीव्र
अमरावती : एखाद्या गावांत पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याचे निवारण करण्यासाठी आराखड्यानुसार नवीन पाणीपुरवठा योजना, देखभाल दुरूस्ती, विहीर अधिग्रहण, टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरूस्ती, कुपनलिका आदी उपाययोजना करण्यात येतात. मात्र, अद्यापही बहुतांश गावांमधील अनेक कुपनलिका बंद पडल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजलस्तर खालावला आहे.

पाठपुराव्यानंतरही दखल नाही
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागासह जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारित विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या दोन्ही विभागांच्या कार्यकक्षेत मोडणाऱ्या गावांमधील पाणीसमस्या मांडण्यासाठी येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी या विभागाकडे पाठपुरावा करतात. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे. प्राधिकरणच्या बाबतीत अनेकदा हा अनुभव आला आहे.

जिल्ह्यात पाणीटंचाई नाही . जेथे पाणीसमस्या होती, तेथे विहीर अधिग्रहण, कुपनलिका, तात्पुरती नळपूरक योजना, टँकर सुरू केले आहेत. याकडे पाणीपुरवठा विभाग गांभीर्यपूर्वक उपाययोजना करीत आहे.
- के.टी.उमाळकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग

Web Title: Water shortage in 150 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.