पाणीटंचाई आराखडा, प्रशासनात लगीनघाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:31+5:302020-12-11T04:38:31+5:30
अमरावती : जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सन २०२१ मध्ये उद्भवणाऱ्या टंचाईसाठी आतापासूनच नियोजनास सुरुवात करण्यात ...

पाणीटंचाई आराखडा, प्रशासनात लगीनघाई
अमरावती : जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सन २०२१ मध्ये उद्भवणाऱ्या टंचाईसाठी आतापासूनच नियोजनास सुरुवात करण्यात आली आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याकरिता प्रशासकीय यंत्रणेत लगीनघाई सुरू झाली आहे. जिल्हा स्तरावरून तालुकास्तरावर पंचायत समित्यांना आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तरीदेखील मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. काही वर्षांत मात्र पाणीटंचाईग्रस्त गावांचा आराखडा थोड्याफार प्रमाणात कमी झाला असला तरी दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. पावसाने उसंत घेतल्यानंतर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचे आराखडे तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील १४ तालुक्यांचे आराखडे डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मागविण्यात आले आहे. यंदा उशिरापर्यंत पाऊस राहिल्याने टंचाई उशिरा सुरू होईल, असा अंदाज आहे. गतवर्षी जवळपास ५० ते ७० च्या वर वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. याशिवाय टँकर आणि टंचाईग्रस्त गावांतील नळजोडणी योजना दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून गतवर्षीही टंचाईचा आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठिवला होता. दोन वेळा दुरुस्तीनंतर त्या प्रस्तावाला मंजुरीसुद्धा देण्यात आली. त्यानुसार ही कामे करण्यात आली आहेत.
बॉक्स
आराखड्यात उपाययोजनांची कामे
दरवर्षी उन्हाळयाच्या दिवसांत भेडसावणाऱ्या पाणीटंचाई निवारणार्थ प्रत्येक तालुक्याच्या टंचाई आराखड्यात संभाव्य टंचाईग्रस्त गावे, याशिवाय टंचाईच्या पार्श्वभूमीवर नळजोडणीची कामे, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, विहीर अधिग्रहण, विंधन विहिरी, बोअरवले आदी कामांचा समावेश केला जातो.